वाहतूक होते प्रभावित : वहिवाटीसाठी रस्ता झाला अरूंदसेलू : नागपूर ते वर्धा मार्गालगत अनेक जडवाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीकरिता हा रस्ता अपुरा पडतो. यातच रस्त्यालगतच्या गावातील व्यावसायिकांनी रस्त्यापर्यंत दुकाने थाटले असून समस्येत भर पडत आहे. वाहतुकीसाठी हा रस्ता डोकेदुखीची ठरत आहे.नागपूर जिल्ह्याची सीमा संपताच वर्धा जिल्ह्यात प्रवेश केल्यावर सेलडोह पासून वर्धेदरम्यान प्रत्येक गावानजीक रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. अपघातास हे अतिक्रमण कारणीभूत ठरत असल्याची ओरड ग्रामस्थातून होत आहे. रस्त्यांचे रुंदीकरण झाले तेवढीच वाहनांची संख्याही वाढली. सुशिक्षीत बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता तरुणवर्ग व्यवसायाकडे वळला. महागडी जागा, वाढता किराया पाहता रस्त्यालगत व्यवसाय लावून कमाईचा मार्ग त्यांना सोयीचा वाढला. पण ज्या मार्गावर व्यवसाय थाटण्यात आले त्या मार्गांवर आज अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमणामुळे आता रस्त्यांचा श्वास गुदमरतो आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. सेलडोहपासून अवघ्या २ कि.मी. अंतरावर असलेल्या खडकी येथे रस्त्यालगत असणारे हॉटेल पाहता बहुतांश वाहनधारक आपली वाहने रस्त्यावरच उभी ठेवतात. त्यामुळे येथे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. येथे कधी वाहतूक पोलीस नसतात. अशावेळी वाहतुकीची कोंडी होते. खडकीवरून पुढे जाताना ऐतिहासिक नगरी म्हणून ओळखल्या जात असलेल्या केळझर येथे नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. येथील प्रवासी निवाऱ्याजवळ व्यावसायिकांनी रस्त्याच्या कडेपर्यंत आपली दुकाने, हातगाडी व ग्राहकांना बसण्यासाठी खुर्च्या लावल्या आहेत. येथे रस्ता मोठा असल्याने वाहने भरधावपणे ओव्हरटेक करतात. त्यामुळे येथे सर्वाधिक अपघात घडत आहेत. अतिक्रमणामुळे वाहनधारकांना होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित होत आहे. प्रशासनाने सजग होणे गरजेचे ठरत आहे.(शहर प्रतिनिधी)
राष्ट्रीय महामार्ग झाला वाहनतळ
By admin | Published: November 12, 2016 1:19 AM