मकरंद अनासपुरे : दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीयस्तरीय ब्लिट्झ किंग २०१७ स्पर्धेचे उद्घाटन वर्धा : विज्ञान आणि निसर्गाची सांगड घालता आली पाहिजे. निसर्गामुळेच आपण जगत आहोत. तंत्रज्ञानाने प्रगती साधतांना जगभरातील ज्ञान आत्मसात करताना युवा पीढीने आपल्या संस्कृतीचे जतन केले पाहिजे. एकत्र या, सातत्याने विचार मंथन करा आणि ज्ञान संवर्धन करा, असा संदेश चित्रपट अभिनेता तसेच नाम फाउंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी विद्यार्थ्यांना दिला. दत्ता मेघे इंस्टिट्युट आॅफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च महाविद्यालयाच्या वतीने आठव्या ब्लिट्झ किंग-२०१७ राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन सावंगी मेघे येथे दत्ता मेघे सभागृहात झाले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर सावंगी रुग्णालयामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजीव बोरले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. उंटवाले, इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. स्मिता नागतोडे, प्रा. वातीले, प्रा. धांदे, विद्यार्थी प्रतिनिधी अपूर्व गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मकरंद अनासपुरे पुढे म्हणाले, पिढी दर पिढी ज्ञान वाढत चालले आहे. तशी नव्या पिढीपुढील आव्हाने वाढत चाललेली आहे. विज्ञानातून अनेक शोध लागले पण विज्ञान कोणाच्या हातात द्यायचे याचे उत्तर मिळू शकले नाही. विध्वंस करणे फार सोपे आहे; पण काही उभे करण्याची प्रक्रिया दीर्घ असते. अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या मुळ गावात शंभर फुटाची शंभर झाडे आयात करून लावली. ही प्रक्रिया दीड महिना चालली; पण ही शंभरही झाडे कोणीतरी एका रात्रीत कापून टाकली. विध्वंस करणे असे सहज सोपे असते. आईसारखा सर्वांना अन्नधान्य पुरविणारा शेतकरी स्वत: उपाशी राहतो, अशा कोरडवाहू शेतकऱ्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी काही इनोवेटीव्ह करावं स्वत:मध्ये चांगुलपणाची प्रक्रिया कायम सुरू ठेवाव्यात रिल हिरो आणि रिअल हिरो याच्यातील फरक ओळखावा. रिअल हिरोंना फालो करा तेव्हाच समाजाकरिता आपण काही करू शकू. हा देश बदलु शकला तर तो केवळ तरुणांमुळेच बदलू शकेल यावर माझा ठाम विश्वास असल्याचेही ते म्हणाले. प्रास्ताविक भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी. उंटवाले राष्ट्रीयस्तरीय ब्लिट्स किंग २०१७ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये असणारी उर्जा तसेच चार वर्षात अभियांत्रिकीमध्ये जे विषय शिकतात, त्या विषयाला नुसार नवीन नवीन अविष्कार करणे त्या अविष्काराचा फायदा वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल असे आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी काम करीत असतात असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांमध्ये असणारी उर्जाच त्यांना मिळणारे ज्ञान राजीव बोरले वर्धा : विद्यार्थ्यांमध्ये असणारी उर्जा तसेच त्यांना मिळणारे ज्ञान या दोघांचा समन्वय साधून समाजाला उपयोगी पडणारं तत्रज्ञान विद्यार्थ्यांनी विकसित करावे, असे मत सावंगी (मेघे) रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजीव बोरले यांनी व्यक्त केले. प्रा.डॉ. स्मिता नागतोडे यांनी राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाचा मुख्य उद्देश, तंत्रज्ञान आणि निसर्ग या दोघांची सांगड कशी घालता येईल. तसेच सामाजिक दृष्टिकोन ठेवून अभियांत्रिकी विद्यार्थी घडला पाहिजे. त्याकरिता आम्ही अशा स्पर्धा घेत असतो, असे सांगितले. विद्यार्थ्यांकरिता रोबो सॉकर, गुगलर प्रोजेक्ट एक्झीबीशन, इंजिनीअरींग आय, लॅन गेमिंग, बिझनेस क्वीझ, अॅग्री बर्ड, ब्रीझ डिझाईन चॅलेंज, अॅक्वारॅकेट लॉचर, टेक्निकल क्वीझ, पोस्टर एक्झीबीशन महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्यात या सर्व स्पर्धांचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रपट अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन करीत आभार डॉ. गायत्री चोपडा यांनी मानले. या राष्ट्रीय स्पर्धेला महा.चे प्राध्यापक, सर्व विभागाचे प्रमुख व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संपूर्ण देशातून आलेले २००० विद्यार्थी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
निसर्ग आणि विज्ञानाची सांगड घालावीच लागेल
By admin | Published: March 05, 2017 12:34 AM