वर्धा, दि. 10 - नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या महाराष्ट्र व छत्तीसगढ राज्याच्या सीमेवरील अबुजमाडात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान जप्त करण्यात आलेले खच्चर प्रजातीचे सहा घोडे सध्या वर्धेच्या पीपल फॉर एनिमल्सच्या करुणाश्रमात आणण्यात आले आहे. त्यांना न्यायालयाच्या आदेशावरून येथे आणण्यात आले आहे. या घोड्यांचा नक्षलवादी दळणवळणासाठी वापर करीत होते.
गत महिन्यात गडचिरोली पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये सीमावर्तीय भाग असलेल्या अबुजमाड येथे चांगलीच चकमक झाली होती. त्यावेळी पोलिसांची शक्ती पाहून नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व नक्षलवाद्यांचे तीन नर व तीन मादी असे खच्चर प्रजातींची एकूण सहा घोडेही जप्त केले होते. हे घोडे चार ते पाच वर्षं वयोगटातील असून जंगलात व खडकाळ ठिकाणी काम करण्यासाठी त्यांना उत्तमरीत्या प्रशिक्षण देण्यात आले आहे. अतिदुर्गम भागात नक्षलवाद्यांचा संपूर्ण दारूगोळा व त्यांच्या मुख्य कमांडरला इतर ठिकाणी नेण्याचे काम हे घोडे करीत होते.गडचिरोली पोलिसांच्या हाती प्रथमच उत्तम प्रशिक्षण देण्यात आलेले हेच ते नक्षलवाद्यांचे घोडे असल्याचे सांगण्यात येते. जप्त करण्यात आलेल्या या घोड्यांना विदर्भात कुठेही ठेवण्याची व्यवस्था नसल्यामुळे न्यायालयाच्या आदेशावरून या सहा घोड्यांना सध्या वर्धेतील पिपरी (मेघे) भागातील पीपल फॉर एनिमल्सच्या करुणाश्रमात न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत ठेवण्यात आले आहे. पोलिसांच्या चोख बंदोबस्तात शनिवारी रात्री या घोड्यांना करुणाश्रमात आणण्यात आल्याचेही सांगण्यात येते. या घोड्यांची निगा सध्या पीपल फॉर एनिमल्सची संपूर्ण टीम घेत आहे.