हिंगणघाट (वर्धा) : खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द काढले. याच घटनेचे पडसाद हिंगणघाट येथे मंगळवारी उमटले. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त विधानाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नंदोरी चौकात निषेध आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सत्तार यांच्या पोस्टरला जोडे-चपलांचा प्रसाद दिला.
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. राज्याची कृषिमंत्री जबाबदारी सांभाळणाऱ्या व्यक्तीकडून करण्यात आलेले वक्तव्य निंदनीय असून, त्यांनी जाहीर माफी मागावी. शिवाय, मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, माजी आमदार राजू तिमांडे, माजी नगरसेवक अनिल भोंगाडे, माजी नगरसेवक सौरभ तिमांडे, महिला जिल्हा उपाध्यक्ष कविता मुंगले, शहर अध्यक्ष मृणाल रिठे, सुचिता सातपुते, निखील गेडाम, विकी शिंदे आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते.