नळदुर्ग : नळदुर्गसह राज्यातील शासकीय जागेवरील अतिक्रमणधारकांना त्यांच्या हक्काच्या जागेचा कबाला देण्याची अंमलबजावणी करून शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरे बांधून देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी केले.श्रावणबाळ माता-पिता सेवा संघ नळदुर्ग शाखेच्या वतीने येथील जि. प. कन्या प्रशालेत शनिवारी पार पडलेल्या कबाला हक्क परिषदेत ते बोलत होते. या परिषदेचे उद्घाटन राजेंद्र निंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मानवी हक्क अभियानचे मराठवाडा विभाग अध्यक्ष बजरंग ताटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मानवी हक्क अभियानचे बजरंग ताटे म्हणाले, शासन कबाल्यावर घर बांधून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांकडून मागील चाळीस वर्षांपासून मतदान करून घेतले जात आहे. मात्र, त्यांना घरे देण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. सर्व मुलभूत सुविधांनी युक्त असलेली घरे जमीनदोस्त करून त्यांचा जगण्याचा हक्क हिरावून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी राजेंद्र निंबाळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सचिन डुकरे व शिवाजी नाईक तर सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे व विनायक अहंकारी यांनी केले. एस. के. गायकवाड यांनी आभार मानले. (वार्ताहर)
प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरे बांधून देण्याची गरज
By admin | Published: August 29, 2016 12:31 AM