प्रदीप दासगुप्ता : खगोलशास्त्रातील मूलभूत संकल्पनांवर कार्यशाळा सेवाग्राम : हातात झाडू असला तरी हीन अथवा कमीपणा वाटुन घेऊ नका. गादीवर बसलो तरी माजणार नाही किंवा सत्तेचा दुरुपयोग करणार नाही असे समतेचे व न्यायपूर्ण शिक्षण नई तालीम देते. बुद्धी, मन, हात आणि हृदय याचा सर्वांगीण विकास करीत बौद्धिक श्रमकार्य करण्याची गरज आहे. बौद्धिकता वापरुनच श्रमकार्य केले पाहिजे, असे मत प्रा. प्रदीप दासगुप्ता यांनी केले. गुणवत्तापूर्ण सार्थक शिक्षण अभियानाच्या अंतर्गत ‘दुर्बीण निर्मिती, खगोलशास्त्र आणि भौतिक व रसायनशास्त्रातील मुलभूत संकल्पना’ या विषयावर तीन दिवसीय निवासी कार्यशाळा नई तालीम, सेवाग्राम येथे घेण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. निळ्या आकाशातील ताऱ्यांच्या व ग्रहांच्याबाबत नेहमीच उत्सुकता असते. शिक्षकांचे आकाशाशी नाते जुळण्याकरिता तसेच खगोलीय, भूगोल, ब्रम्हांड आणि मानवी संबंधांना जाणून घेण्याकरिता ही कार्यशाळा घेण्यात आली. दुर्बीण आणि भौतिकशास्त्राच्या मुलभूत संकल्पनांवर खगोलशास्त्राचे अभ्यासक व ज्युनिअर आॅलिम्पियाडचे समन्वयक प्रा. प्रदीप दासगुप्ता यांनी मार्गदर्शन केले. तर हिस्लॉप कॉलेज नागपूरचे डॉ. मयूर खेडकर, डॉ. सोयब खान यांनी रसायनशास्त्रातील छोटे आणि महत्त्वाचे प्रयोग विशद करुन सांगितले. नई तालीमचे प्रभाकर पुसदकर यांनी डोळ्यांची आंतरिक रचना, काळजी व दक्षता याविषयी माहिती दिली. अधिव्याख्यात्या सीमा पुसदकर, प्रा. उर्मिला हाडेकर यांनी समायोचित मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या अन्य सत्रात माजी शिक्षणाधिकारी सोनावणे, अनिल फरसोले, आनंद निकेतनच्या सुषमा शर्मा यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला ३४ शाळेतील ५३ मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. यात दुर्बीण बनविण्याचे तंत्र, लेन्स, प्रतिमा व प्रतिबिंब यांचे सूत्र, आकाशातील ग्रह-तारे, सूर्यमालिका, ग्रहण, विशेष खगोलीय घटना, विविध प्रकारच्या दुर्बीण याची तज्ज्ञांनी माहिती दिली. कार्यशाळेत शिक्षकांनी दुर्बीण तयार करुन अवकाश निरीक्षण करण्याचे तंत्र अवगत केले. रसायनशास्त्राच्या मुलभूत संकल्पना, क्रिया आणि समाजातील उपयोगिता याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. खगोलीय संकल्पना, दृष्टी आणि सृष्टी, लेन्सचे कार्य, निगा व काळजी या विषयावर स्लाईडशोच्या माध्यमातून डॉ. खेडकर व डॉ. खान यांनी माहिती दिली. रसायन शास्त्रातील शालेय पातळीवरचे तसेच दैनंदिनी व्यवहारातील प्रयोग, त्याकरिता लागणारे परिसरातील तसेच आवश्यक साधन-साहित्य याची माहिती दिली. प्रास्ताविक सीमा पुसदकर यांनी केले. संचालन नीलम तामगाडगे यांनी तर आभार प्रा. उर्मिला हाडेकर यांनी मानले. गौतम पाटील, विद्या वालोकर, मंगला डोंगरे, वैशाली चिकटे, संजय वाढावे, सीमा मेहता, वंदना येनूरकर, जया गावंडे या शिक्षकांनी समारोपीय कार्यक्रमात सादरीकरण केले. डॉ. शिवचरण ठाकूर, पवन रनवार, करुळे, आदींनी सहकार्य केले.(वार्ताहर)
बौद्धिकता वापरूनच श्रमकार्य करण्याची गरज
By admin | Published: April 26, 2017 12:32 AM