टी. दिलीपकुमार : परिचारिका महाविद्यालयातील प्राचार्यांचे संमेलन, विविध राज्यातील १०७ प्रतिनिधी सहभागीवर्धा : जगभरात प्रत्येक व्यवसायात झपाट्याने आमूलाग्र बदल होत आहे. व्यवसाय यशस्वी करण्यातकरिता कठोर परिश्रमाची गरज असते. सेवा हा नर्सिंगचा निश्चितच अविभाज्य भाग आहे. मात्र या सेवेला व्यावसायिकतेची सांगड घातली तरच जागतिक स्तरावर टिकून राहता येईल. त्यादृष्टीने या अभिमत विद्यापीठाने आयोजित केलेले नर्सिंग प्राचार्य संमेलन हे एक क्रांतिकारी पाऊल आहे, असे प्रतिपादन इंडियन नर्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष टी. दिलीपकुमार यांनी केले. सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या राधिकाबाई मेघे मेमोरियल कॉलेज आॅफ नर्सिंगद्वारे राष्ट्रीय स्तरावर परिचारिका महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे संमेलन आयोजित केले होते. यावेळी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. समारोहाच्या अध्यक्षस्थानी द. मे. आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे मुख्य सल्लागार व भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या शैक्षणिक समितीचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश मिश्रा तर अतिथी म्हणून विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य सागर मेघे, मुख्य समन्वयक डॉ. एस. एस. पटेल, प्रकुलगुरू डॉ. अशोक पखान, कुलसचिव डॉ. राजीव बोराले, ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन आॅफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्ष अनिता देवघर, विशेष कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे, नर्सिंग समन्वयक मनीषा मेघे, परिचर्या शाखेचे प्राचार्य भालचंद्र कुलकर्णी, अधिष्ठाता प्रा. वैशाली ताकसांडे, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या नर्सिंग संचालिका सिस्टर टेसी सेबेस्टीनयन, प्राचार्य बेबी गोयल आदी उपस्थित होते.नर्सिंग व्यवसाय हा प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी वर्गाचा अविभाज्य घटक असल्याचे सांगून अध्यक्षीय भाषणात डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, जागतिक बदलांसोबतच एव्हिडन्स बेस्ड नर्सिंग प्रॅक्टीससाठी नवी क्षितिजे शोधावी लागतील आणि ही क्षितिजे पादाक्रांत करण्यासाठी विद्वानांच्या विचारांचा ‘थिंक टँक’ म्हणून उपयोग करावा लागेल. प्राचार्य हा महाविद्यालयाच्या दैनंदिन व्यवहाराचा अविभाज्य भाग असून त्यांना शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक बैठक असते. आज संपूर्ण जग भारताकडे आरोग्यसेवेसाठी मोठ्या आशेने बघत आहे. अशावेळी मूकदर्शक बनण्याऐवजी जागतिक निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची क्षमता निर्माण करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण प्राचार्य बी. डी. कुळकर्णी यांनी केले. उद्घाटन सत्राचे संचालन प्रा. वैशाली तेंडोलकर आणि विशाल पाखरे यांनी केले. आभार टेसी सेबेस्टीयन यांनी मानले. या दोन दिवसीय संमेलनात अद्यावत परिचर्या अभ्यासक्रम, नवप्रशिक्षण, नर्सिंग कौन्सिलच्या मूलतत्वांची अंमलबजावणी, फेलोशीप आदी मुद्यांवर चर्चा होणार आहे. संमेलनासाठी महाराष्ट्रासह पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध प्रदेश, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, मिझोरम, तामिळनाडू, केरळ, गुजरात, झारखंड, छत्तीसगड, गोवा आदी राज्यातील १०७ नर्सिंग स्कूल व महाविद्यालयांचे प्राचार्य सहभागी झाले आहे.(शहर प्रतिनिधी)
नर्सिंग सेवेत व्यावसायिकतेची सांगड घालण्याची गरज
By admin | Published: July 06, 2015 2:17 AM