चित्रा रणनवरे : तीन दिवसीय वर्धिनी महोत्सवाचा थाटात शुभारंभवर्धा : आजच्या स्पर्धेच्या युगात गुणवत्तापूर्ण उत्पादित मालाला अधिक मागणी आहे. बाजारपेठेची ती गरज झाली आहे. त्यामुळे महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी गुणवत्तापूर्ण उत्पादित माल तयार करून काळानुरुप मार्केटिंगचे बदलते तंत्रज्ञान आत्मसात करून जागतिक बाजारपेठेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष चित्रा रणनवरे यांनी केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या संयुक्तपणे न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मैदानावर आयोजित तीन दिवसीय वर्धिनी महोत्सवाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास कांबळे, महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती चेतना मानमोडे, सदस्य वीरेंद्र उर्फ राणा रणनवरे, सुनीता ढवळे, मीना वाळके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोदकुमार पवार, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी एस.एम. खळीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे यांची उपस्थिती होती. चित्रा रणनवरे यांनी महिला बचत गटाची चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम हाती घेण्यात येत असून या उपक्रमांचा बचत गटांनी लाभ घ्यावा. महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या माध्यमातून विविध महिलांनी जिल्ह्यात यश मिळविलेले आहे. त्यामुळे आजच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जागतिक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी नवनवीन तंत्रांचा वापर आजच्या बचतगटांनी करावा, विपणन तंत्रांचा अवलंब करावा, असेही त्या म्हणाल्या. लोकांना आवश्यक असणाऱ्या लोकोपयोगी वस्तुंची निर्मिती करून बाजारपेठ काबीज करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जि.प. उपाध्यक्ष कांबळे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटीबद्ध असून महिला बचत गटांना आता बिनव्याजी कर्ज देण्यात येईल. तसेच कर्जाच्या व्याजाची रक्कम शासन भरेल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महिला सक्षमीकरणासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे प्रस्ताव सादर करण्यात यावा. जिल्ह्यातील महिलांनी बचत गट चळवळ अधिक सक्षमपणे पुढे नेली असून त्यांचा माल गुणवत्तापूर्ण आहे; परंतु त्याला मार्केटिंगची जोड मिळाल्यास जागतिक बाजारपेठेत मालाची मागणी वाढेल त्यासाठी प्रशिक्षण केंद्र आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच महिलांनी गुणवत्तापूर्ण दर्जेदार उत्पादनाची निर्मिती करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असेही कांबळे यावेळी म्हणाले. यावेळी सभापती चेतना मानमोडे, सुनीता यांनीही वर्धिनी महोत्सवाबाबत विचार मांडले. यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहचावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच कवठा रेल्वे येथील स्थानिक संसाधन व्यक्ती वंदना महल्ले यांनीही मनोगत व्यक्त केले. वैयक्तिक शौचालय वापरणाऱ्या महिला बचत गटांच्या निर्मलग्राम महिला संघाचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये सावंगी मेघेच्या एकता, नाचणगावच्या संगिनी, वाघोलीच्या दीप, अांतरगावच्या सृष्टी महिला संघाचा समावेश होता. चित्रा रणनवरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने महोत्सवाचे उद्घाटन झाले. प्रास्ताविक पवार यांनी केले. संचालन सचिन घोडे यांनी केले तर आभार अविनाश गोहड यांनी मानले. कार्यक्रमानंतर मान्यवरांनी जिल्हाभरातून दाखल झालेल्या ६२ दालनांमधील विविध वस्तूंची पाहणी केली.(प्रतिनिधी)
महिला बचत गटांना मार्केटिंग तंत्रज्ञानाची आवश्यकता
By admin | Published: March 12, 2016 2:23 AM