पोलीस अधीक्षकांना साकडे : चिडीमारीचे प्रकार वाढले लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरात ग्रामीण भागातून अनेक मुले-मुली शिक्षणाकरिता येतात. प्रवासादरम्यान विद्यार्थिनींना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच सेवाग्राम स्टेशन रोड ते महाविद्यालयापर्यंतच्या मार्गावर विद्यार्थिनींना चिडीमारीचा सामना करावा लागत आहे. टवाळखोर मुले स्टेशन रोड परिसरात ठिय्या मांडून असतात. पोलीस प्रशासनाने या प्रकाराला आळा घालण्याकरिता प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी सागर युवा संघटनेन केली आहे. या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. निवेदनानुसार, स्टेशनरोड ते शहरातील न्यू आर्टस्, यशवंत महाविद्यालय व अन्य महाविद्यालयापर्यंत जाताना विद्यार्थिनींचा टवाळखोर मुलांकडून अनेकवार पाठलाग केला जातो. ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींकडे वाहन व्यवस्था नसल्याने त्यांना पायीच ये-जा करावी लागते. या संधीचा फायदा घेवून टवाळखोर मुले दुचाकी अथवा चालत जावून मुलींचा पाठलाग करतात. तसेच अश्लिल भाषेचा वापर करून मानसिक त्रास दिला जातो. मुलींनी चिडीमारी प्रकाराचा विरोध केला असता टवाळखोर मुलांकडून त्यांना धमकाविण्याचे प्रकार घडले आहे. नियमित प्रवास करणाऱ्या काही विद्यार्थिनींनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधून सदर प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार निवेदन देण्यात येत असून तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे. या मागणीचे निवेदन अपर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी स्वीकारले. निवेदन देतेवेळी अध्यक्ष संदीप कुत्तरमारे, जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत काळे, कोषाध्यक्ष रिजवान अली, शहर अध्यक्ष गुंजन मेंढुले, प्रियंका महाबुधे, रोशनी मडावी, अश्विनी महाबुधे, प्राजक्ता धनविज, अपर्णा घुंगरूड, रितु मसराम, अमोल मसराम, सूरज हरगे, सूरज वाणी, अमित बोबडे, चंद्रशेखर वाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते. सागर युवा सामाजिक संघटनेचे निवेदन या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यास हा प्रकार गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याला निमंत्रण देणारा ठरू शकतो. त्यामुळे या प्रकाराला वेळीच आळा घालून प्रभावी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. ग्रामीण विद्यार्थिनींना रस्त्याने ये-जा करताना असुरक्षितेची भावना जाणवते. या भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्याची गरज व्यक्त केली.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी उपाययोजनांची गरज
By admin | Published: June 24, 2017 12:58 AM