वर्धा : पारंपरिक पद्धतीने बीमारीचा इलाज करणारे चिकित्सक लोक स्वास्थ्य चिकित्सक आहेत. आजच्या चिकित्सा प्रणालीत आधुनिक वैदूगण नंदादीपासारखे आहेत. मानवी स्वास्थ्य प्रणाली सुदृढ ठेवण्यासाठी पारंपरिक चिकित्सेला चालना देण्याची गरज आहे. असे प्रतिपादन कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्ल यांनी केले.
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात विश्वविद्यालयाचा मानवविज्ञान विभाग व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 15 व 16 रोजी आयोजित ‘विदर्भ परिक्षेत्रातील देशज चिकित्सक : विद्या प्रदर्शनी व सम्मेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
श्यामाप्रसाद मुखर्जी भवनात कार्यक्रमाचा समारोप रविवारी झाला. यावेळी ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेचे संस्थापक डॉ. सतीश गोगुलवार, आय.आय.एम., नागपूचे निदेशक प्रो. भीमराया मैत्री, वनवासी कल्याण आश्रम, नागपूरचे अखिल भारतीय युवा कार्य प्रमुख वैभव सुरंगी यांनी विचार मांडले. प्र कुलगुरु प्रो. चंद्रकांत रागीट व मानविकी तथा सामाजिक विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. अनिल कुमार राय हेही मंचावर उपस्थित होते. या प्रसंगी कुलगुरु प्रो. शुक्ल यांनी विदर्भातील वैदुंचा सन्मान सूतमाला, अंगवस्त्र, सन्मान पत्र व प्रतीक चिह्न देऊन केला. कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्ज्वलन व कुलगीताने करण्यात आला.
मुख्य अतिथी प्रो. भीमराया मैत्री म्हणाले की विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे संपूर्ण विश्व भारताकडे बघत आहे. समृद्ध देशज चिकित्सा पद्धतीच्या प्रभावाने ज्ञानार्जनाकरिता आम्ही आता शहराकडून खेड्यांकडे जात आहोत. भारतात देशज चिकित्सा व्यापक झाली असून तिला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
विशिष्ट अतिथी वैभव सुरंगी म्हणाले की ज्ञानाच्या प्राचीन परंपरेकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. शैक्षणिक संस्थांनी सामाजिक व्यवस्थेचा अभ्यास करुन संशोधन करावे असे आवाहन त्यांनी केले. मुख्य वक्ता डॉ. सतीश गोगुलवार यांनी आचार्य विनोबा भावे यांचे पुस्तक आरोग्य विचार व तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता यांचा उल्लेख केला.
40 वर्षांपासून जनजाती समुदायासोबतचे अनुभव सांगतांना ते म्हणाले की परंपरागतरितीने उपचार करणारे वैद्य हळू-हळू कमी होत आहेत. नवी पीढी हे काम करतांना दिसत नाही. या उपचार पद्धतीचे अध्ययन व दस्तावेजीकरण आवश्यक झाले आहे व हे काम विद्यापीठांनी हाती घेतले पाहिजे. देशज चिकित्सा प्रदर्शनात 40 हून अधिक वैद्यांनी वनस्पति, जड़ी - बुटी व वस्तुंचे स्टाॅल लावले होते. कार्यक्रमात स्वागत भाषण प्रो. अनिल कुमार राय यांनी केले. प्रास्ताविक मानवविज्ञान विभागाचे प्रो. फरहद मलिक यांनी केले. संचालन डॉ.अर्चना भालकर यांनी केले तर डॉ. निशीथ राय यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कुलगुरु प्रो. शुक्ल व आमंत्रित पाहुण्यांनी प्रदर्शनाचे अवलोकन केले. यावेळी अध्यापक, शोधार्थी, विद्यार्थी, गणमान्य नागरिक सेवाग्रामचे डाॅ. ओ. पी. गुप्ता, डॉ. अनुपमा गुप्ता, विधि सेवा प्राधिकरणचे विवेक देशमुख, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, आधारवड संस्थेचे शेख हाशम, बहार नेचर फाउंडेशनचे प्राध्यापक किशोर वानखेड़े, जयंत सबाने, वन्य जीव प्रतिपालक संजय इंगळे तिगावकर, डॉ. मेहरे, डॉ. प्रशांत खातदेव उपस्थित होते.