टाकरखेड : आर्वी पंचायत समिती अंतर्गत टाकरखेड येथे रोजगार हमीची कामे करण्यात आली. परंतु या कामात गैरकारभार करण्यात आल्याची तक्रार तंटामुक्त समिती अध्यक्ष बबन कोल्हे व उपाध्यक्ष सुधाकर सहारे यांनी आर्वी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचेकडे केली. त्यांच्यावर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. या योजनेच्या कामात ज्या मजुरांनी रोजगार हमी योजनेचे काम केले नाही त्यांची मस्टरवर हजेरी दाखवून खोटी रक्कम काढण्यात आली. ज्यांनी या योजनेत काम केले त्यांचे वेतन काढण्यात आले, परंतु प्रत्यक्षात मात्र त्या मजुरांच्या बँक खात्यात जमा झाले नाही. या योजनेत खोटी कामे दाखवून व खोटे मस्टर बनवून मजुरांच्या हक्काची रक्कम गैर मार्गाने हडपण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्याचप्रकारे पांदण रस्त्यासाठी २३ नोव्हेंबर २०११ रोजी तांत्रिक मान्यता क्रमाक ४३१/११ नुसार ४ लाख ९८ हजार २९७ रुपये मंजूर होते. या कामाच्या लोकेशननुसार मातामाय ते बकाराम नेमाडे व दीपक चौधरी यांच्या घरामागून ते रघुनाथ कान्हव यांच्या घरापर्यंत काम ठरले होते. पण प्रत्यक्षात येथे कुठलेही काम करण्यात आलेले नाही. मग ही रक्कम कोणत्या कामावर, कुठे आणि का खर्च केली याचा तपास घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. हाच प्रकार वृक्षारोपणातही आढळून आला आहे. वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत अनेक झाडे लावण्यात आली. त्याचा संगोपनाचा खर्चही दाखविला. प्रत्यक्षात मात्र किती झाडे जगविली याची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी आहे. तसेच या कारवाईकडे दुर्लक्ष केल्यास पंचायत समिती समोर १ जानेवारी २०१५ पासून उपोषण करण्यात येईल असेही निवेदनात नमूद आहे. अशा गौरप्रकारांमुळे मजुरांची आर्थिक स्थिती बिकट झाली असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या गंभीरबाबीकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच आर्वीच्या तहसीलदारांचेही लक्ष वेधण्यात आले आहे.(वार्ताहर)
रोजगार हमी योजनेच्या कामात गैरकारभार
By admin | Published: December 25, 2014 11:37 PM