लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पोलीस विभागाच्यावतीने बाहेर जिल्ह्यातून येत असलेला दारूसाठा पकडण्यात येत आहे. असे असतानाही वर्धा शहरात मात्र मुबलक दारू मिळत आहे. शहरातील या दारूविक्रेत्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांची मेहरनजर असल्याचा आरोप होत आहे. शहरातील मध्यभागी ठाकरे मार्केट, महादेवपुरा, गोल बाजार, आरती चौक, अष्टभूजा चौक, रामनगर, या सारखे जवळपास ५० ठिय्ये असून येथे दारूविक्रेत्याकडून बिनबोभाटपणे दारू विक्री सुरू आहे. ठाकरे मार्केट लगत नाल्याच्या काठावर सायंकाळच्यावेळी होत असलेल्या दारूविक्रीमुळे रस्ता जाम होत असल्याचे चित्र आहे. या रस्त्यावर गर्दी झाल्याने येथे अपघाताची शक्यता आहे. यामुळे पोलीस विभागाने याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे. दारूविक्री होत असलेल्या या भागात पोलिसांच्या चकरा होतात. पोलीस येत असताना येथील दारूविक्रेत्यावर कार्यवाही होत नाही. यामुळे पोलिसांच्या येण्या-जाण्यावर येथे प्रश्न निर्माण होत आहे. दारूबंदीकरिता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एका विशेष पथकाची निर्मिती केली आहे. या पथकाकडूनही दारूबंदीच्या कारवाईच्या नावावर केवळ जिल्ह्याच्या बाहेरच कार्यवाही सुरू आहे. या सर्व प्रकारामुळे शहरातील दारूविक्रीकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत असून यावर आळा घालणे गरजेचे झाले आहे. जिल्ह्याच्या सिमेवर त्या क्षेत्रातील पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने कार्यवाही होत आहे. मात्र शहरातील दारूविक्रीकडे साऱ्यांचे दुर्लक्ष आहे. नव्या या पथकाकडून शहरातील दारूविक्रीवर आळा घालणे शक्य आहे. असे असताना या पथकाकडून जिल्ह्याच्या नियमाप्रमाणे कार्यवाही करून आपली सेटींग करण्याचा प्रकार होत असल्याचे वास्तव आहे. याकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांसह अप्पर पोलीस अधीक्षकांनीही लक्ष देत कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेष पथकाकडून कारवाईच्या नावावर अतिरेक जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकात काही खास कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांकडून दिलेल्या अधिकाराचा दुरूपयोग होत आहे. या पथकाने एका दारूविक्रेत्यावर कार्यवाही केली. या कारवाईत त्यांनी दारूविक्रेत्यासह त्याच्या शेजारी राहणाऱ्या इसमाच्या मालकीच्या वाहनावर ते गावात नसतानाही कारवाई केली. एवढेच नाही तर ते वाहन फरार घोषित केले. यामुळे सदर वाहन मालकाला आता वाहन सोडविण्याकरिता पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागत आहेत. जिल्ह्यात सुरू असलेली कार्यवाही आहे त्याच प्रकारात सुरू राहणार आहे. शहरात सुरू असलेल्या दारूविक्रीवर अधिक कडक कारवाई करण्यात येईल. दारू विक्रीच्या गुन्ह्यात नसलेले वाहन विशेष पथकाच्या कर्मचाऱ्यांनी गुन्ह्यात दाखविले असल्यास त्याची तक्रार केल्यास कार्यवाही करणे सोपे होईल. - चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा
शहरातील दारूविक्रीकडे पोलिसांचे दुर्लक्ष
By admin | Published: July 12, 2017 1:59 AM