सेलू पोलिसात गुन्हा दाखल : बँकेत गहाण असलेले भूखंड विकलेसेलू : बँकेकडे गहाण ठवलेले भूखंड ग्राहकांना विकल्याचा प्रताप वर्धेतील गजानन नगरीचे संचालक सतीश नरहरशेट्टीवार यांनी केल्याचे शुक्रवारी उघड झाले. या प्रकरणी काही ग्राहकांनी सेलू पोलिसात तक्रार दाखल केली केली. या प्रकरणी सतीश व त्यांची पत्नी कविता नरहरशेट्टीवार या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रानुसार, नरहरशेट्टीवार दाम्पत्याचे गजानन नगरी नावाने सेलू येथे ले-आऊट निर्माण केले. यातील २८ भूखंड ८ आॅक्टोबर २०१२ रोजी सेलूच्या तिरूपती अर्बन को-आॅपरेटीव बँक शाखा वर्धाकडे गहाण केले होते. यातीलच गहाण प्लॉट त्यांनी पुन्हा अनेकांना विकल्याची माहिती काही नागरिकांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी ही बाब तिरूपती अर्बन बँकेकडे जात जाणून घेतली. त्यांना मिळालेली माहिती सत्य असल्याचे उघड झाले. यावरून बँकेचे व्यवस्थापक आतिश तराळे यांनी नरहरशेट्टीवार दाम्पत्याविरोधात सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सतीश व कविता नरहरशेट्टीवार या दोघांवर भादंविच्या कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सेलू पोलीस करीत आहेत. अशाच प्रकारचे व्यवहार या दोघांनी देवळी येथे केल्याचेही सांगण्यात येत आहे.(तालुका प्रतिनिधी)
नरहरशेट्टीवार दाम्पत्याचा भूखंडधारकांना गंडा
By admin | Published: July 18, 2015 1:58 AM