जुन्याच इमारतीची डागडूजी : विभाग व कर्मचाऱ्यांच्या तुलनेत जागा कमीसेलू : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या सेलू तालुक्यात पंचायत समितीला नवीन इमारत मिळणार असल्याची चर्चा मध्यंतरी जोरात होती. यातच पंचायत समितीच्या जुन्याच इमारतीची डागडुजी सुरू झाल्याने ही चर्चा हवेतच विरल्याचे दिसून येत आहे. यामुळे सेलू पंचायत समितीची नवीन इमारत दिवास्वप्नच तर ठरणार नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.पंचायत समिती कार्यालयाच्या कामाला बुधवारपासून प्रारंभ झाला. या कार्यालयाच्या वऱ्हांड्याच्या नुतनीकरण कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे येथील नवीन इमारतीचा प्रश्न शासन दरबारी धूळखात पडला असल्याचे दिसून येते. या वऱ्हांड्याच्या नुतनीकरणासोबतच दोन खोल्यांमधील जुन्या असलेल्या फरशी काढून तिचे काम करण्यात येणार आहे. पंचायत समितीची स्थापना झाली, तेव्हापासून असलेले कार्यालय आता जीर्ण झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत कार्यालयाला गळती लागते. यामुळेच छतावर ताडपत्री टाकण्यात आली. प्रत्येक विभागासाठी असलेल्या खोल्या कर्मचाऱ्यांना बसण्यासही पुरेशा नाही. परिणामी, कामांचा खोळंबा होत आहे. येथील वसाहतीचीही पुरती वाट लागली आहे. ६२ ग्रामपंचायतीचा कारभार पाहणारी पंचायत समितीची दुरवस्था पाहता लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचेच दिसते. दहा वर्षांच्या कारकीर्दीत तीन वेळा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद या तालुक्याला मिळाले आहे. असे असताना विकासाच्या नावावर येथे भोपळाच असल्याचे दिसते.(शहर प्रतिनिधी)
पंचायत समितीची नवीन इमारत दिवास्वप्न
By admin | Published: March 18, 2016 2:26 AM