विनोद घोडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: यावर्षी सोयाबीनच्या पेऱ्यामध्ये वाढ झाली असतानाच सुरुवातीपासून सोयाबीन उत्पादकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रारंभी बोगस बियाण्यांमुळे दुबार पेरणी झाली, खोडकिडीमुळे सोयाबीन करपून गेले तर काही सोयाबीनला शेंगांचा पत्ताच नाही. या संकटासोबतच सवंगणीकरिता परप्रांतातून येणाऱ्या मजुरांनी कोरोनामुळे नकार दर्शविल्याने सोयाबीन उत्पादकांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे.
जिल्ह्यामध्ये ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात आली. मागीलवर्षी कापूस उत्पादकांना वाईट अनुभव आल्याने यावर्षी सोयाबीनच्या पेऱ्यात वाढ केली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये १ लाख ३७ हजार २६६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली असून सततच्या पावसामुळे आणि रोगामुळे ४३ हजार १४५ हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात आले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांचे सुरुवातीलाच कंबरडे मोडले. बऱ्याच भागातील सोयाबीन सवंगणीला आले असून जिल्ह्यात दरवर्षी छत्तीसगढ, बालाघाट, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, बल्लारपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील हजारो मजूर दाखल होतात. सोयाबीन सवंगणे, कापूस वेचणे आदी कामे आटोपून ते आपल्या गावी निघून जातात. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना मजुरांची टंचाई भासत नाही. मात्र, यावर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे असंख्य मजुरांना वाईट अनुभव घेऊनच गाव गाठावे लागले. त्यामुळे त्यांनी आता येण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांपुढे मजुरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वांच्या सवंगणीचा एकच वेळ येत असून गावातील मजूर पुरेसे ठरणारे नसल्याने मजुरीकरिता शेतकºयांना खिसा खाली करावा लागणार, हे निश्चित.आहे तेही मातीत मिसळणार?
गावागावामध्ये सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे. सोयाबीनला अपेक्षेप्रमाणे शेंगा नसल्या तरी त्यातून मिळणाऱ्या उत्पादनातून खर्च भागविण्याची तयारी शेतकºयांची आहे. पण, परप्रांतीय मजुरांनी येण्यास नकार दिल्याने सोयाबीन सवंगणीकरिता गावातीत मजूर पुरेसे नाहीत. सततचा पाऊस आणि मजुरांअभावी शेतात उभे असलेले सोयाबीनही मातीमोल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर्षी सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका सहन करावा लागणार असल्याचे एकंदरीत चित्र आहे.
राज्यभरातच कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने या भीतीपोटी जिल्ह्याबाहेर मजूर येण्यास तयार नाहीत. पढेगाव येथे दरवर्षी १० ते १२ टोळ्या बाहेर जिल्ह्यातून सप्टेंबर महिन्यात येतात. ते सर्व मजूर एप्रिल ते मे महिन्यापर्यंत कामे आटोपून परत जातात. पण, यावर्षी त्यांना स्वगावी जाताना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यामुळे त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी येण्यास नकार दिला. त्यामुळे मजुरांचे नवे संकट उभे ठाकले आहे.बाबाराव सातपुते, शेतकरी, पढेगाव