लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-२०२३ राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत नवमतदारांना मतदार यादीमध्ये नावे नोंदविता येणार असून, नवमतदारांसह विद्यार्थी, दिव्यांग व महिला आदींनी सक्षम लोकशाहीकरिता आपली नावे मतदार यादीमध्ये नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. ९ नोव्हेंबरला एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, ८ डिसेंबरपर्यंत दावे आणि हरकती नोंदविता येणार आहेत. या कालावधीत जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी व्हावी, याकरिता १९ व २० नोव्हेंबर आणि ३ आणि ४ डिसेंबर या चार दिवशी संबंधित मतदान केंद्र व तहसील कार्यालयात विशेष शिबिर आयोजित केले जाणार आहे. दिव्यांग, विद्यार्थी व महिलांकरिता १२ व १३ नोव्हेंबरला विशेष शिबिर घेतले जाणार आहे. यासोबतच तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्ती या घटकांचाही मतदार यादीमध्ये समावेश करून घेण्यासाठी २६ व २७ नोव्हेंबरला शिबिर घेतले जाणार आहे. त्यानंतर २६ डिसेंबरला दावे, हरकती निकाली काढून ५ जानेवारी २०२३ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे मतदारांनी आपली नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करावी किंवा कमी करून घ्यावीत, शिवाय २०२३ च्या जानेवारी, एप्रिल, जुलै किंवा ऑक्टोबर महिन्याच्या १ तारखेला किंवा त्याआधी ते १८ वर्षांचे होणारे असतील, त्यांनीही या कार्यक्रमात नावनोंदणी करून घ्यावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, अतुल रासपायले, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड उपस्थित होते.
छायाचित्र नसलेले ६३ हजार ८५९ मतदार वगळले- मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यामधील प्रत्येक मतदार केंद्रनिहाय मतदारांची तपासणी करण्यात आली. सुरुवातीला जिल्ह्यात ११ लाख ५९ हजार ६५४ नावे मतदार यादीमध्ये होती, परंतु या मतदार यादी निरीक्षणादरम्यान ज्यांचा योग्य पत्ता नाही, जे दिलेल्या पत्त्यावर राहत नाही किंवा ज्यांचे मतदार यादीमध्ये छायाचित्र नाही, असे ६३ हजार ८५९ नावे वगळण्यात आली आहेत. आता आर्वी मतदारसंघात २ लाख ५४ हजार ७५२, देवळीत २ लाख ६८ हजार १३५, हिंगणघाट मतदारसंघात २ लाख ९४ हजार ४०१, तर वर्धा मतदारसंघात २ लाख ७८ हजार ५०७ असे एकूण १० लाख ९५ हजार ७९५ मतदार असल्याचे उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी सांगितले.
आज ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा- जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये गुरुवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभेमध्ये प्रारूप प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीचे वाचन केले जाणार आहे. यात गावातील मयत, स्थलांतरित झालेल्या व वगळावयाच्या मतदारांची संख्या कमी करण्याबाबत, तसेच नवीन मतदार नोंदणीबाबत कार्यवाही केली जाणार आहे.
शिक्षक मतदारांनी नव्याने नोंदणी करावी- नागपूर विभाग शिक्षक मतदार नोंदणी कार्यक्रमही याच संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान राबविला जात आहे. आतापर्यंत आठही तालुक्यांतून ४ हजार २०० अर्ज प्राप्त झाले आहेत. ज्यांनी गेल्या निवडणुकीकरिता नावनोंदणी केली असेल त्यांनाही यावर्षाकरिता नव्याने नावनोंदणी करावी लागणार आहे. त्यामुळे तातडीने नावनोंदणी करण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे. २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर होणार असून, ३० डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.