विरूळ (आ.) : संपूर्ण राज्यातील ग्रा.पं. मध्ये शासनाच्या आदेशानुसार ग्रामस्वच्छता अभियान व हागणदारी मुक्त गाव हा कार्यक्रम धडाक्यात सुरू आहे. शासनाच्या या चांगल्या कार्यक्रमाने राज्यातील अनेक गावे स्वच्छ झालीत; पण आर्वीतालुक्यात महत्त्वाचे असलेल्या विरूळ येथील ग्रा.पं. तीन वर्षांपासून स्वच्छता अभियानच राबविले नाही. यामुळे गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.ग्रामस्वच्छता अभियानामुळे अनेक गावे आरशासारखी चकचकीत झाली असून ती आदर्शवत ठरलीत; पण आर्वी तालुक्यात सर्वात मोठे सामाजिक व राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्या विरूळ गावाने दोन ते तीन वर्षांत कधीही ग्रामस्वच्छता अभियान राबविले नाही. यामुळे गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गावातील नाल्या तुंबल्या असून भवानी वॉर्डातील नाल्या पूर्णपणे बुजल्या आहेत. यामुळे गावातील सांडपाणी रस्त्यांवरून वाहताना दिसते. गावात सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.सांडपाणी तुंबल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डेंग्यू, मलेरीया आदी आजारांचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गाव अस्वच्छ व दुर्गंधीमध्ये हरविले असताना ग्रामपंचायत प्रशासन झोपेचे सोंग घेऊन असल्याचे दिसते. रसुलाबाद, सोरटा, हुसेनपूर या गावांजही हीच परिस्थिती पाहायला मिळते. केवळपिंपळगाव, वडाळा येथील सरपंच व नागरिकांनी गाव आरशासारख चकचकीत केले आहे. या गावाची प्रेरणा इतर गावातील नागरिक व ग्रामपंचायत प्रशासनाने घेणे गरजेचे झाले आहे. शासनाचे आदेश असताना येथील ग्रामसेवकाने स्वच्छता अभियानाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. विरूळ, रसुलाबाद, सोरटा या गावांतील ग्रामसेवकांना स्वच्छता अभियानाचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केवळ शासकीय आदेश आहे म्हणून अनेक गावांत हे अभियान कागदोपत्रीच राबविले गेल्याचे पाहायला मिळते.गावात रस्त्याच्या कडेला कचर्याचे ढिगारे साचलेले असून रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी त्रासदायक ठरत आहे. ग्रामस्वच्छता अभियान राबविण्याची मागणी ग्रामस्थांद्वारे होत असतानाही स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने असंतोष पसरला आहे. गावातून वर्धेकडे जाणार्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचर्याचे ढिगारे असून गावातील मुख्य चौकातही नाल्या तुंबल्याचे दिसून येते. गावातील अंतर्गत रस्त्यांचीही अत्यंत दुरवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देत साथीच्या आजारांचा उद्रेक होण्यापूर्वी ग्रामस्वच्छता अभियान राबवावे, अशी मागणी ग्रामस्थांद्वारे करण्यात येत आहे. शिवाय नागरिकांनीही स्वच्छता राखणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)
ग्रामस्वच्छता अभियानाला ग्रामपंचायतीची बगल
By admin | Published: May 08, 2014 2:11 AM