शहरातील बहुतेक पंपावर पिण्याचे पाणीच नाही : स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने महिलांची कुचंबणा रूपेश खैरी / प्रशांत हेलोंडे वर्धापेट्रोल पंपावर आलेल्या ग्राहकाला पेट्रोल देताना बहुतांश पंपावर चूना लावल्या जात असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. हजारो ग्राहकांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या या पंपांवर मात्र शासनाच्या निकषानुसार देण्यात येणाऱ्या सुविधांना बगल देण्यात येत असल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या पाहणीत पुढे आले आहे. शहरातील बऱ्याच पंपावर हवा भरण्याची सुविधा नाही, थंड पाणी तर नावालाच असल्याचे दिसून आले आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून शौचालय आहे; मात्र ते सहज कोणाच्या नजरेत पडेल अशा ठिकाणी नसल्याने नागरिकांकरिता त्याचा लाभ होत नाही. कदाचित पंपावर अशा सुविधा असाव्या याची माहिती नागरिकांना नसावी, असे वर्धेत असलेल्या चित्रावरून दिसत आहे. वर्धा शहरात व शहरालगत एकूण १२ पंप आहेत. यातील सात पंप शहरात व पाच पंप शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत आहे. या पैकी शहरात असलेल्या बजाज चौक व नागपूर मार्गावर असलेल्या एका पंपावर नागरिकांकरिता थंड पाण्याची सुविधा असल्याचे दिसून आले आहे. असे असले तरी शहरातील एकही पेट्रोल पंप ‘पॉश’ या सज्ञेत बसत नसल्याचे दिसून आले. आर्वी मार्गावरील एक पंप सोडून बहुतांश पेट्रोलपंपावरील हवा भरण्याचे यंत्र निकामी असल्याचे दिसून आले आहे. याच पंपावर यंत्राजवळ पंपावरील एक कर्मचारी असल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी यंत्र आहेत; पण त्यावर कर्मचाऱ्याची नेमणूक नसल्याने ते निरुपयोगी ठरत आहे. त्यामुळे वाहनचालकांनी या यंत्रांवरून स्वता:च हवा भरावी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांकरिता असलेली नि:शुल्क सेवा सदा बंद राहत असल्याने पंपावरून पेट्रोल भरून निघाल्यानंतर बाहेरच्या दुकानातून पैसे मोजून हवा भरून घावी लागत आहे. पेट्रोल भरल्यानंतर हवा भरून देणे हे पंपावरील कर्मचाऱ्यांचेच काम असताना त्यासाठी वाहनचालकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. पंपावरील अशा सुविधांबाबत नागरिकांनी जागृत राहणे आवश्यक आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. पेट्रोप पंपावर आवश्यक असलेल्या सुविधा पेट्रोलपंपाच्या आवारात चांगल्या प्रतीची यंत्रणा लावून मागणीप्रमाणे वाहनांमध्ये हवा भरून देणे, त्यासाठी जाणकार कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे.उत्तम अवस्थेतील स्वच्छतागृह असावे. यात महिला व पुरूषांकरिता वेगवेगळी सोय असावी. शिवाय त्यांचा वापर होण्याकरिता नेहमी पाणी उपलब्ध असावे.पंपावर २४ तास शुध्द पाणी असावे. तसेच पाणी थंड करण्याचे यंत्र असणे अनिवार्य आहे. तक्रार व सूचना पुस्तिका असणे गरजेचेपेट्रोलपंपावर यापैकी कोणतीही सुविधा न मिळाल्यास ग्राहकाला जागच्या जागी आपली तक्रार नोंदविता येते. त्यासाठी पंपावर सीएस बुक (कम्प्लेट अॅँड सजेशन) असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक ग्राहक या तक्रारवहीची कधीच मागणी करीत नाहीत. ग्राहक पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष पंपावर असलेल्या सुविधांच्या अभावाकडे जिल्हा ग्राहक पंचायतीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सभेत जिल्ह्यातील पंपांची तपासणी करण्याच्या सूचना सर्वच तहसीलदारांना देण्यात आल्या होत्या. याला सुमारे महिन्याचा कालावधी होत असला तरी जिल्ह्यात एकाही तहसीलदाराने पंपांची तपासणी करून अहवाल सादर केला नसल्याचे ग्राहक परिषदेचे अजय भोयर यांनी सांगितले.
पेट्रोल पंपावर नियमांना बगल
By admin | Published: September 13, 2015 1:53 AM