के्रन्स, वाहनांचा गजबजाट : वाहतूक शहरातून केली होती वळती लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम गत अनेक दिवसांपासून रखडले होते. ते काम पूर्ण करण्याचा निर्णय झाल्याने रस्ते महामंडळ आणि रेल्वे प्रशासनाने निर्णय घेत शुक्रवारी रात्री काम सुरू केले. येथे रात्रभर क्रेन, वाहन आणि कामगारांची गर्दी होती. एका रात्रीत या पुलावर गॅरडर्स ठेवण्यात आले आहे. यामुळे लवकरच हा पूल वाहतुकीकरिता मोकळा होण्याची शक्यता आहे. या कामाकरिता रात्री या मार्गावरील वाहतूक वळती करण्यात आली होती. तत्सम सूचना पूर्वीच देण्यात आल्या होत्या. यामुळे तेवढा काळ शहरातून वाहतूक झाली. मिळालेल्या माहितीनुसार हा मार्ग एका महिन्यात वाहतुकीसाठी खुला होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यानंतर काही काळाने दुसरा मार्गही खुला करण्यात येणार असल्याची माहिती आहे. रखडलेले काम पूर्ण करण्याकरिता या पुलाजवळ महाकाय क्रेन्स, ट्रकने आणलेले स्पेअर्स पार्टस्, गिरडर्स गाड्यांचा ताफा, प्रखर दिव्यांच्या रांगा, कामगारांची मोठी संख्या यामुळे येथे बघ्यांची चांगलीच गर्दी झाली होती. या माध्यमातून उड्डाण पुलावर लोखंडी गिरडर्स (बिम) ठेवण्यात आली. रात्रभर येथे सुरू असलेले काम सकाळपर्यंत चालूच होते. प्रखर दिव्यांच्या प्रकाश झोतात येथे अनेक कामगारांसह नागपूर विभागीय स्तरावरील महामार्गाचे आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे कार्य रात्रभर सुरू होते.
रात्रभर उड्डाणपुलावर कामगारांचा डेरा
By admin | Published: May 14, 2017 12:45 AM