बोरगाव (गोंडी) येथील प्रकार : दोघांना ३० पर्यंत न्यायालयीन कोठडी आकोली : खरांगणा वनपरिक्षेत्राच्या बोरगाव (गोंडी) सहवनक्षेत्रात शेताच्या कुंपणात वीज प्रवाह सोडला होता. यात अडकून निलगाईचा मृत्यू झाला. याप्रकरणी वन कायद्यानुसार आरोपी नामदेव महादेव रक्ते (५५) व शेषराव यशवंत मसराम (२८) यांना अटक करण्यात आली. त्यांना ३० जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, बोरगाव (गोंडी) शिवारात गोविंद भामकर यांचे शेत आहे. दोन वर्षांपासून सदर आरोपी शेत ठेक्याने घेत आहे. सदर शेत जंगलाला लागून असल्याने शेतपिकांचे नुकसान होत होते. यामुळे आरोपींनी शेताच्या सभोवती तारेचे कुंपण करून त्यात वीजप्रवाह सोडला होता. रात्री निलगाय वीजप्रवाह सोडलेल्या तारेला चिपकून मरण पावली. सदर निलगाईची विल्हेवाट लावण्याकरिता तिचे पाय तोडून शेषराव यशवंत मसराम या आरोपीच्या मदतीने विल्हेवाट लावली. वनरक्षक मनीष सज्जन व क्षेत्र सहायक ए.एम. डेहणकर यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाचा पंचनामा केला. पशुधन विकास अधिकारी पाटील यांनी मृत निलगाईचे शवविच्छेदन केल्यानंतर निलगाईचे दहन करण्यात आले. याप्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम १, ३१, ५०, ५१ अन्वये दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दोघांनाही ३० जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली.(वार्ताहर)
वीज प्रवाहाद्वारे निलगाईची शिकार
By admin | Published: January 22, 2017 12:28 AM