वर्धा : नापिकी, शेतमालाला मिळणारा अत्यल्प दर यातून वाढत असलेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येचे सुरू झालेले सत्र आजही कायम आहे. राज्यात पहिल्या आत्महत्येला आज ३१ वर्षे पूर्ण होत आहे. या घटनेची स्मृती आणि शासनाच्या शेतकऱ्यांविरोधी असलेले धोरण या विरोधात रविवारी वर्धेत महात्मा गांधी यांच्या पुजळ्याजवळ तथा सेवाग्राम आश्रमासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. दोन्ही ठिकाणी झालेल्या आंदोलनात जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. शिवाय जनमंच, आम्ही वर्धेकर यासह विविध संघटनांच्या सदस्यांची यात उपस्थिती होती. यावेळी शेतमालाला रास्त भाव देण्यात यावा, स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा, शेतकऱ्यांवरील संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात वर्धेसह इतर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झालेल्या घटनेची स्मृती आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्याकरिता या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. अन्नत्याग आंदोलनाला ठरल्याप्रमाणे आज सकाळी १० वाजता प्रारंभ झाला. ठरलेले ठिकाण महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एकेक करीत शेतकरी आणि त्यांच्या परिवारातील सदस्य गोळा झाले. या आंदोलनाला वर्धेतील अनेक सामाजिक संस्थांनी पाठींबा दिल्याने त्यांचीही येथे गर्दी होऊ लागली. उन्हाचा पारा चढत असल्याने आंदोलकांनी त्यांचे स्थळ बदलवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या झाडाच्या सावलीत नेले. येथे एकत्र आलेल्या आंदोलकांनी महात्मा गांधी यांची जीवनचरित्राचे आणि त्यांच्या इतर पुस्तकाचे वाचन केले. प्रत्येकाकडून महात्मा गांधींच्या जीवनचरित्राचे वाचन समस्या शेतकऱ्यांच्या असो वा इतर कोणत्याही, त्या सोडविण्याकरिता महत्मा गांधी यांचे विचार व त्यांची जीवनी यातूनच मार्ग मिळतो. राज्यकर्त्यांना याचीच जाणीव व्हावी याकरिता अन्नत्याग आंदोलनात सहभागी प्रत्येकाने महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्राचे वाचन केल्याचे बोलले जात आहे.
महात्मा गांधींच्या साक्षीने अन्नत्याग आंदोलन
By admin | Published: March 20, 2017 12:41 AM