विजय माहुरे घोराडनिर्मल ग्राम योजना राबवून घरोघरी शौचालय तयार करण्याची शासनाची योजना आहे. शौचालयाचे उदीष्ट पूर्ण करण्याकरिता व सेलू तालुका निर्मलग्राम बनविण्यासाठी आठ हजार ३९३ घरी शौचालय उभारण्याकरिता तालुका प्रशासनाची धावपळ सुरू आहे. शिल्लक असलेल्या या घरी लवकरच शौचालय तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहे. सेलू तालुक्यात ६३ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. गत वर्षी गावागावात झालेल्या बेस लाईन सर्र्व्हेक्षणानुसार २३ हजार ८४२ कुटुंब संख्या आहे. यात अनुसूचित जाती ३,९३४ तर अनुसूचित जमाती ३,६५७ इतर १२ हजार २५१ कुटुंब संख्येचा समावेश आहे. यापैकी तालुक्यात दहा हजार ९१८ कुटुंबाकडे शौचालय आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबाची संख्या १२ हजार ८२४ एवढी आहे. आजतागायत २९६१ शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून १५०० शौचालयाचे बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. यामुळे ८,३९३ शौचालयाचे विविध गावात बांधकाम करावयाचे असून ग्रामपंचायत लाभासाठी कुटुंब प्रमुखाला योजनेची माहिती देत असून जॉब कार्ड काढण्यासाठी गर्दी होत आहे.हे काम नरेगा अंतर्गत असून यासाठी ग्राम पातळीवर ग्रामरोजगार सेवक ग्रामविकास अधिकारी गाव निर्मल व्हावे म्हणून प्रयत्नरत आहेत. गोदरी असलेल्या ठिकाणी शौचास बसू नये असे फलकही लावून उघड्यावर शौचालयास बसणाऱ्यास दंड व फौजदारी गुन्ह्याचा धाकही दाखविण्यात आला आहे. पंचायत समितीच्यावतीने विस्तार अधिकारी, संपर्क प्रमुख आदींची चमू गावागावात गुड मॉर्निंग पथक म्हणून कार्यरत आहे. निर्मल तालुका होण्याचे उद्दीष्ट जून महिन्यापर्यंतच असल्याचे सांगण्यात येत असल्याने धडपड सुरू आहे.
निर्मल ग्राम योजना : तालुका गोदरीमुक्त बनविण्याकरिता प्रशासनाची धडपड
By admin | Published: June 28, 2014 12:34 AM