एक रात्र कवितेची कार्यक्रमात श्रोते अंतर्मुख हिंगणघाट : ‘गुंठा गुंठा जमीन विकून, आज गोफ आली गळ्यात, पण एक वेळी मातीचा वास हुंगायला उद्या रक्त येईल डोळ्यात’, आपल्याच आतडीचा भावा करू नये हेवा, वाटा इस्टेटीत नको वाटा काळजात हवा’ या कवितांच्या सादरीकरणाने उपस्थित श्रोत्यांना अंतर्मुख केले. लोकसाहित्य परिषद हिंगणघाट यांच्यावतीने ‘एक रात्र कवितेची’ या काव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले. यात सहभाभी कविंनी सामाजिक समस्यांचा आढावा घेणाऱ्या कविता सादर केल्या. काव्य मैफलीच्या उद्घाटन कार्यक्रमाला आमदार समीर कुणावर, अध्यक्षस्थानी डॉ. प्रा. उषा थुटे होत्या. मंचावर नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी, डॉ. हरिषचंद्र बोरकर, प्राचार्य ना.गो. थुटे, लोकसाहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र चाफले, नितीन पखाले, गजानन बढे, डॉ. कडूकर, सुभाष निनावे यांची उपस्थिती होती. यानंतर ‘विदर्भ लोकरत्न’ हा सन्मान ज्येष्ठ कवी शंकर बडे यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. आ. समीर कुणावर, झाडीबोली साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या हस्ते बडे यांच्या पत्नी कौशल्या बडे व मुलगा गजानन यांनी हा सन्मान स्वीकारला. झाडीबोली साहित्यिक क्षेत्रातील कार्याबद्दल ना.गो. थुटे, प्रसाद पाचखेडे, तंत्रस्नेही शिक्षक पुरुषोत्तम बावणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यानंतर कविता सादरीकरण झाले. ‘कस सांगाव साहेबं हा देह आहे, कला केंद्र नाही, इथं फक्त घुंगरू तेच मनासारखं वाजत, घुंघराच्या तालावर आईसारख दिसणारं शरीर बाईसारख नाचतं’ या ओळीतून तमाशात काम करणाऱ्या स्त्रीचे आत्मकथन भारत दौडकर, पुणे यांनी मांडले. प्रसिद्ध वऱ्हाडी कवी किशोर बळी, अकोला, संवेदनशील कवी जयंत चावरे, यवतमाळ यांनी कविता सादर केल्या. भारत दौडकर यांनी काळजाचा ठाव घेणाऱ्या कविता सादर केल्या. ‘आम्ही कुठल्या जनतेचे ठकबाकीदार आहोत, म्हणून आम्हाला काय विचारता, मतासाठी मातीत गेलो, ईतकीच आमची थकबाकी पुरेशी नाही का?’ तसेच ‘जन्माला आलो तेव्हाच आम्ही सावकाराच्या सात बाऱ्यावर लिहून गेलो, अन कित्येक जणांच्या आत्महत्येचे पिकपाणी विदर्भाच्या खात्यावर लिहून आलो’ या कवितांनी विशेष दाद मिळवली. किशोर बळी यांनी किस्से व कवितांनी रसिकांना विनोदाची मेजवानी दिली. यासह प्रबोधन करणाऱ्या शेतकरी कविता सादर केल्या. कवी जयंत चावरे यांनी सादर केलेल्या विनोदी किस्यांनी पोट धरून हसविले. काही गंभीर कवितांनी श्रोत्यांना विचार करण्यास भाग पाडले. ‘घाव होतील पावलोपावली, वार होतील ठायीठायी, तरी खचून जायचं नाही, अस मैदान सोडायचं नाही, हे जीवन एक लढाई, कधी हिम्मत हारायची नाही’, यासारख्या कवितांनी सभागृह चिंब झाले. स्व. शंकर बडे यांच्या आठवणी सोबतच त्यांची एक कविता ‘लाडा कौतुकाची लेक आज सासरी चालली, जशी किशन देवाची कोण बासरी चोरली’ तर सैराट मधील गाण्यांच्या चालीवर सादर केलेल्या ‘तुझं सांगायचे काही, मेहंदीच्या भरला रंग तळहाती, तुझ्या चढताना अन अखेर माझ्यासाठी डोळे तुझे झरताना’, किंवा ‘माय असावी साऱ्याले’ या कवितांनी श्रोत्यांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अभिजित डाखोरे यांनी केले. संचालन गिरिधर काचोळे यांनी तर आभार ज्ञानेश्वर चौधरी यांनी मानले. काव्य मैफलीला रसिक श्रोत्यांनी गर्दी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोहर ढगे, प्रभाकर कोळसे, राजू कोंडावार, प्रा. रवींद्र ठाकरे, गणपत गाडेकर, अमित चाफले, आशिष भोयर, प्रदीप गिरडे, रामेश्वर बोके, चंद्रशेखर उताणे, सुभाष शेंडे, गजानन झाडे, महेंद्र घुले, विजया घंगारे, मद्दलवार, नितीन शिंगरु, गजानन शेंडे, उमेश मानकर, योगेश खोडे, रमेश झाडे, अभिजित साबळे आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)
वाटा इस्टेटीत नको, काळजात हवा
By admin | Published: February 11, 2017 12:49 AM