लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्ध्यासह विदर्भात सध्या दिवसेंदिवस तापमान वाढत असून, आगीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे शॉर्टसर्किटमुळे एका एटीएम कक्षाला अचानक आग लागली. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एटीएम कक्षांचा रिॲलिटी चेक केला असता बहुतांश एटीएम कक्षांत सुरक्षा रक्षक अन् अग्निशामक सिलिंडरच नसल्याचे बघावयास मिळाले.जिल्ह्यात विविध बँकांच्या सुमारे १३० शाखा आहेत. यापैकी काही बँक शाखेच्या शेजारीच एटीएम कक्ष तर काही ठिकाणी बँकांपासून काही अंतरावर एटीएम कक्ष असल्याचे वास्तव आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक एटीएम कक्षांत सीसीटीव्ही बसविण्यात आले असले तरी निम्म्याहून अधिक एटीएम कक्षांत सुरक्षा रक्षक आणि एखाद्यावेळी अचानक आग लागल्यास परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फायद्याचे ठरणारे अग्निशामक सिलिंडरच नसल्याचे चित्र बघावयास मिळाले. त्यामुळे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील एटीएम कक्षांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
जिल्ह्यात विविध बँकांचे २०० हून अधिक एटीएम- जिल्ह्यात विविध बँकांचे २०० हून अधिक एटीएम कक्ष आहेत; पण निम्म्याहून अधिक एटीएम कक्षांत सुरक्षा रक्षकच नसल्याचे चित्र बघावयास मिळते. असे असले तरी प्रत्येक एटीएम कक्षात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही असल्याचे निदर्शनास आले.
प्रत्येक तीन महिन्यांनी इलेक्ट्रिक ऑडिट क्रमप्राप्तच- प्रत्येक एटीएम कक्षाचा संबंधित अधिकृत एजन्सी तसेच बँकेकडून विमा काढला जातो. एटीएम कक्षातील इलेक्ट्रिक व्यवस्था उत्तम आहे काय, याची पडताळणी करण्यासाठी प्रत्येक तीन महिन्यांनी एटीएम कक्षाचा इलेक्ट्रिक ऑडिट होणे क्रमप्राप्तच आहे.
एटीएममध्ये राहते किमान दहा लाखांची रोकडकिमान दहा लाखांची उलाढाल होत नसल्यास बँकांनाही एटीएम सुरू ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसून एका एटीएममध्ये किमान दहा लाखांची रोकड राहत असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.