आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दोन वर्षे कोरोनाने चांगलाच हाहाकार माजविला होता. या आजारातून नागरिकांची सुखरूप सुटका व्हावी म्हणून लसीकरणाला गती देण्यात आली. लसीकरण हे एक सुरक्षा कवच ठरल्याने अनेकांचा कोरोनापासून बचावही झाला. त्यामुळे दोन डोस घेतल्यानंतर बूस्टर डोसही घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. परंतु कोरोनाची लाट ओसरताच नागरिकांच्या मनातीलही भीती नाहीशी झाल्याने कोविड लसीकरण करण्याचीही गती मंदावली. आता पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्यांच्या तुलनेत बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या फारच अल्प आहे. कोरोनाची पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट जिल्ह्याकरिता फारच भयावह राहिली. त्यानंतर लसीकरणाला गती देण्यात आल्याने अनेकांचा कोरोनापासून बचाव झाला. या कोरोनाला रोखण्याकरिता दिवसरात्र काम करणारे आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना कोविड लसीकरणात प्राधान्य देण्यात आले. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी वर्ध्यात उपलब्ध झाल्या असून क्रमा-क्रमाने लसीकरणाला गती मिळाली. जिल्ह्यात एकूण १० लाख ७० हजार ३५२ व्यक्ती लसीकरणास पात्र असून त्यापैकी १० लाख ३२ हजार ६७३ व्यक्तींनी पहिला डोस घेतला. यापैकी केवळ ८ लाख १५ हजार ६७३ व्यक्तींनीच दुसरा डोस घेतला असून बुस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या केवळ ६३ हजार २३ इतकीच आहे. यावरून जसजशी कोरोनाची लाट ओसरत गेली, तसतशी नागरिकांच्या मनातील भीतीही कमी झाल्याने लसीकरणाकडेही पाठ फिरविल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
शासनाने दिलेली ‘डेडलाईन’ संपली- शासनाकडून पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्यांकरिता बूस्टर डोसही सुरू केला आहे. प्रारंभी ६० वर्षापेक्षा अधिक वयांच्या व्यक्तीकरिता बूस्टर डोस सुरू करण्यात आला. त्यामध्ये केवळ १६ टक्के व्यक्तींनीच हा डोस घेतला. यानंतर ४५ ते ५९ आणि १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींकरिता बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली. - पण, यामध्ये डोस घेणाऱ्यांची संख्या नगण्यच राहिली. या वयोगटातील व्यक्तींकरिता शासनाकडून ३० सप्टेंबरपर्यंत डेडलाईन देण्यात आली होती. आता तारीख संपूनही शासनाकडून कोणतेही पत्र आरोग्य विभागाला प्राप्त झाले नाही. त्यामुळे आता लसीकरण होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
फ्रंटलाइन वर्करही बुस्टरमध्ये मागेच- कोरोनाकाळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच त्यांना आरोग्यासह इतर सुविधा पुरविण्याकरिता कंटेनमेंट झोन, कोविड सेंटर, विलगीकरण कक्ष आदी ठिकाणी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर यांना प्रथमत: लसीकरण करण्यात आले. त्यांचा पहिला व दुसरा डोस सर्वात झाला. पहिला डोस घेणाऱ्यांनी दुसरा डोस आणि दोन्ही डोस घेणाऱ्यांनी बुस्टर डोस घेणे क्रमप्राप्त होते. परंतु पहिला डोस घेणाऱ्यांच्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. आणि बुस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या त्याहीपेक्षा कमी आहे.