लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात यंदा जलसंकट अतिशय गडद झाले आहे. याकरिता टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात आले; मात्र पावसाळ्याला सुरुवात होऊनही जिल्हा प्रशासनाच्या केवळ नियोजनाच्या दुष्काळामुळे टँकरद्वारे शहरालगतच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.गतवर्षी ६५ ते ७० टक्के इतका अत्यल्प पाऊस झाला. याचाच परिणाम जिल्ह्यातील लघु आणि मध्यम जलाशयांमध्ये पुरेसा जलसंचय नाही. यामुळेच शहरात आणि ग्रामीण भागात अनुक्रमे पाच ते सहा आणि १५ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. दुसरीकडे शहरातील आणि लगतच्या ग्रामीण भागातील विहिरी, कूपनलिका, विंधन विहिरींनाही कोरड पडली आहे. त्यामुळे जलसंकट अतिशय तीव्र झाले आहे. यामुळे पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत नागरिकांची पाण्याकरिता दाहीदिशा भटकंती पाहायला मिळते. अनेक जण दुचाकी-चारचाकी वाहनाच्या माध्यमातून दूरवरून पाणी आणत असल्याचे चित्र दिसून येते. पाणी प्रश्न पेटल्याने शहरालगतच्या बहुतांश ग्रामपंचायतींकडून जिल्हा प्रशासनाकडे टँकरसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले. प्रथम जिल्हा प्रशासनाने मागविलेल्या अनेक प्रस्तावांमध्ये त्रुटी काढून ग्रामपंचायत प्रशासनाकडून सुधारित प्रस्ताव मागत वेळकाढू धोरण अवलंबिले. हे प्रस्ताव प्रशासनदरबारी टेबलांची शोभा वाढवत आहेत.शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करणारे शंभरावर व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडून खासगीरीत्या टँकरद्वारे हव्या त्या भावात पाणीविक्री सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याकरिता निविदा प्रक्रियाही राबविली. ५ ते ६ हजार लिटरच्या पाणीटँकरकरिता १२०० ते १३०० रुपये दर ठरविण्यात आला. मात्र, शासनदरापेक्षा खासगी पाणीविक्रीत अधिक फायदा होत असल्याने पाणी टँकर व्यावसायिकांनी जिल्हा प्रशासनाच्या निविदा प्रक्रियेकडे पाठ फिरविली. त्यामुळे पावसाळ्याला सुरुवात होऊनही केवळ नियोजनाचा अभाव आणि बोथट जाणिवांमुळे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन कागदावरच राहिल्याचे बोलले जात आहे.२० जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठाशहरालगतच्या ११ ग्रामपंचायतींना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे सद्यस्थितीत पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र जलाशयात २० जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्यासाठी हाहा:कार होईल, असे पुढील चित्र आहे.निकषाचाही खोडा!जलसंकट तीव्र झाले असताना टँकरद्वारे अद्याप पाणीपुरवठा झाला नाही. याविषयी प्रशासनातीलच एका अधिकाऱ्याने मुळात ग्रामपंचायतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे निकषातच बसत नाही. मात्र, जनक्षोभ वाढू शकतो, याकरिता अधिकारी ही बाब स्पष्ट करीत नसल्याचे सांगितले. त्यामुळे केवळ प्रस्ताव मागवून प्रशासनाकडून वेळकाढू धोरण अवलंबिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
आला पावसाळा, तरी टँकरने पाणीपुरवठा नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 10:34 PM
जिल्ह्यात यंदा जलसंकट अतिशय गडद झाले आहे. याकरिता टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात आले; मात्र पावसाळ्याला सुरुवात होऊनही जिल्हा प्रशासनाच्या केवळ नियोजनाच्या दुष्काळामुळे टँकरद्वारे शहरालगतच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.
ठळक मुद्देप्रशासनाच्या बोथट जाणिवा : ग्रामपंचायतींचे प्रस्ताव धूळ खात