फनिंद्र रघाटाटे
रोहना (वर्धा) : विदर्भातील इंग्रजकालीन नॅरोगेज शकुंतला रेल्वे गाडी मागील अनेक वर्षांपासून बंदावस्थेत आहेत. या नॅरोगेज रेल्वेलाइनचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून शकुंतला रेल्वे पुन्हा सुरू करावी, यासाठी नागरिकांच्या आग्रहास्तव भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाला पत्र पाठविले. पण, अद्यापही काहीच कार्यवाही झाली नसल्याने त्यांच्या पत्रालाही रेल्वे मंत्रालयाने केराची टोपली दाखविल्याचे दिसून येत आहे.
विदर्भातील यवतमाळ, अचलपूर-मूर्तिजापूर-आर्वी-पुलगाव व नागभीड आणि ब्रह्मपुरी या तीन इंग्रजकालीन नॅरोगेज शकुंतला रेल्वेगाड्या सुरू होत्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्या मार्गांवरून त्या धावत होत्या; परंतु गेल्या वीस वर्षांपासून या तिन्ही रेल्वे बंद असल्याने या भागातील वाहतूक प्रभावित झाली आहे. या सर्व गाड्या ब्रॉडगेजमध्ये बदलवून आणि या मार्गांचा विस्तार सुरू करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
सन २०१४ च्या निवडणुकीदरम्यान भाजपने या बंद गाड्या सुरू करू, असे आश्वासन दिले होते; पण निवडणूक झाल्यानंतर पक्षाने आणि सरकारनेही त्याकडे लक्ष दिले नाही. केंद्रातील भाजपची दुसरी टर्म सुरू असून, सध्या रावसाहेब दानवे हे रेल्वे राज्यमंत्री आहेत. त्यामुळेच ही रेल्वे सुरू व्हावी, याकरिता आग्रही असलेल्या रोहना येथील रेल्वेमुक्ती व विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ही बाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सांगितली. त्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पत्राद्वारे मागणी केली; पण अद्यापही दखल घेतली नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
या रेल्वे मार्गावर भारत सरकारचा ताबा
तिन्ही रेल्वे गाड्या सन २०१६ ला इंग्रज सरकारच्या मालकीतून मुक्त झाल्या व आता या मार्गावर भारत सरकारचा पूर्ण ताबा असल्याची बाबही शासनाच्या लक्षात आणून दिली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पटल्याने त्यांनी लगेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र पाठवून यवतमाळ ते अचलपूर ही रेल्वेगाडी बैतुलपर्यंत पुढे नेऊन, आर्वी- पुलगाव ही तिवसा-चांदूरपर्यंत वाढवून व नागभीड ते ब्रह्मपुरीला ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करून रेल्वे सुरू कराव्यात, अशी मागणी केली. आता पत्र पाठवून चार महिन्यांचा कालावधी लोटला, दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. तरीही याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. यामुळे या प्रश्नासंदर्भात शासन उदासीन असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.