आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील धुनिवाले चौक ते पावडे नर्सिंग होमपर्यंत असलेल्या बॅचलरोडच्या सिमेंटीकरणात सुरुवातीपासूनच नियोजनाचा अभाव दिसून आला आहे. तसेच सदोष बांधकाम होत असल्याचा आरोपही वारंवार करण्यात आला; पण बांधकाम विभाग कंत्राटदाराच्या ‘माया’ जाळात गुरफटलेला असल्यामुळे काम पूर्ण होण्यापूर्वीच या रस्त्याची डागडुजी करण्याची नामुष्की ओढवली आहे.शहराचा विकास व्हावा यासाठी शहराकरिता कोट्यावधींचा निधी बांधकाम विभागाला प्राप्त झाला आहे. यातून शहरातील मार्गांचे सिमेंटीकरण व रुंदिकरणाचे काम सुरु आहे. या रस्त्यांचा कंत्राट एकाच कंत्राटदाराला देण्यात आल्याने त्याची मनमर्जीने काम सुरु असल्याचे दिसून येत आहे. धुनिवाले मठ ते पावडे चौकापर्यंत बॅचलर रोडच्या सिमेंटीकरणासाठी अंदाजीत रक्कम २४ कोटी ९९ लाख रुपये आहे. हा कंत्राट १० टक्के बीलोने गेल्याने कंत्राटदारासोबत २० कोटी ६४ लाख ३७ हजार रुपयांचा करार करण्यात आला. या रस्त्याचे बांधकाम १० जानेवारी २०१६ पासून सुरु करण्यात आले आहे. प्राकलनानुसार ३१ मार्च २०१८ पर्यंत पुर्ण करायचे होते. सदोष कामामुळे सुुरुवातीपासून तक्रारी सुरु झाल्या त्या अद्यापही कायम आहे. आज कालावधी संपून पाच महिन्याचा कालावधी लोटला तरीही काम आस्ते कदमच सुरु आहे. विशेषत: काम पुर्णत्वास जाण्यापूर्वीच या रोडवर डागडूजीही करावी लागत आहे. आर्वी नाका ते धुनिवाले मठ या मार्गावर तीन ते चार ठिकाणी डागडूजी करण्यात आली आहे. रस्त्याच्या लोकार्पणापूर्वीच ही अवस्था असल्याने कामाचा दर्जा काय असेल? याची प्रचिती पुन्हा वर्धेकरांना आली आहे. तरीही कंत्राटदारावर कोणतीच कारवाई होत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नियम आणि नियोजनाला बासणात गुंडाळून कंत्राटदारावर मेहरबानी दाखवत असल्याची ओरड वर्धेकरांकडून होत आहे.सा.बा.च्या आशीर्वादाने पेटी कंत्राटदाराचे फावलेसार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी नियमांवर बोट ठेऊन कार्य तत्परता दाखवतात. परंतु, शहरातील सिमेंटीकरणाच्या कामात ही कार्यतत्परता ‘द्रव्यात’ वाहून गेल्याची ओरड होत आहे. नियमानुसार पेटी कंत्राट देता येत नाही. शहरातील बॅचलर रोड आणि शिवाजी चौक ते जुनापाणी चौक हे दोन्ही मोठे कंत्राट जे.पी.एन्टरप्राईजेस दिल्याची कागदोपत्री नोंद आहे. परंतू प्रत्यक्षात बॅचलर रोडचे काम पेटी कंत्राटदार भारती व तिवारी करीत आहे. तर दुसऱ्या सिमेंटीकरणाचे काम तिवारी आणि एस.आर.के. कंपनीच्या माध्यमातून सुरु आहे. पण, या नियमबाह्य कामाला बांधकाम विभागाची साथ असल्याचा आरोप होत आहे.लोकप्रतिनिधींच्या तक्रारींकडे कानाडोळाबॅचलर रोडच्या कामात होत असलेली दिरंगाई आणि सदोष बांधकामामुळे नागरिकांनी सुरुवातीपासून तक्रारीचा पाढा वाचला. नालीचे बांधकाम, पेव्हर ब्लॉक, अल्पावधीतच रस्त्यावर पडलेल्या भेगा, नियोजनाअभावी वाहतुकीची कोंडी, दुभाजकामुळे होणारा त्रास, रस्त्यावरील विद्युत पोल, अशा असंख्य तक्रारी झाल्याने आ. डॉ.पंकज भोयर यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन वेळेत काम पुर्ण करण्याच्या सूचना देत एक महिन्याचा कालावधी दिला होता. या दरम्यान बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहनातूनच पाहणी करुन निघून गेले होते. तसेच खा. रामदास तडस व नगराध्यक्ष अतुल तराळे यांनीही बांधकाम विभागाकडे सदोष बांधकामाबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती; पण लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतरही त्याच कंत्राटदाराच्या माध्यमातून सुरु असलेले काम अद्यापही पुर्णत्वास गेलेले नसल्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
ना... नियम, ना... नियोजन फक्त कमिशन...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 12:14 AM
शहरातील धुनिवाले चौक ते पावडे नर्सिंग होमपर्यंत असलेल्या बॅचलरोडच्या सिमेंटीकरणात सुरुवातीपासूनच नियोजनाचा अभाव दिसून आला आहे.
ठळक मुद्देबॅचलर रोड बांधकाम : कंत्राटदारावर बांधकाम विभागाची ‘माया’, काम पूर्ण होण्यापूर्वीच डागडुजी