लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सोमवार १ मार्चपासून जिल्ह्यातील वयोवृद्धांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरुवात झाली असून त्याला जिल्ह्यातील वयोवृद्धांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे लोकमतने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले.कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घेऊ इच्छिणारे आरोग्य सेतू ॲप तसेच कोविन ॲपवर घरी बसूनच नोंदणी करू शकतात. इतकेच नव्हे तर लसीकरण केंद्रावरही नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा या केंद्रावर अवघ्या चार मिनिटांत नोंदणी तर दोन मिनिटांत लस दिली जात असल्याचे चित्र बघावयास मिळाले. केंद्र सरकारच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यात तीन ठिकाणी खासगी लसीकरण केंद्र तर दहा ठिकाणी शासकीय लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. सोमवारी काही तांत्रिक अडचणीमुळे जिल्ह्यातील तिन्ही खासगी लसीकरण केंद्रे सुरू झाली नव्हती. तर जिल्ह्यातील दहाही लसीकरण केंद्रांतून वृद्धांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७४ वृद्ध तर ११ अतिजोखमीच्या व्यक्तींनी लस घेतली.
हर्ड ह्युमिनीटीसाठी लस उपयुक्तदिवसेंदिवस जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून कोरोनाशी लढा देण्यासाठी दिली जात असलेली कोविडची प्रतिबंधात्मक लस उपयुक्तच असून देण्यात येणारी लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.
येथे मिळेल नि:शुल्क लसजिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट, उपजिल्हा रुग्णालय आर्वी, ग्रामीण रुग्णालय सेलू, ग्रामीण रुग्णालय पुलगाव, ग्रामीण रुग्णालय समुद्रपूर, ग्रामीण रुग्णालय कारंजा (घा.), ग्रामीण रुग्णालय आष्टी (श.), एम.जी.आय.एम.एस. सेवाग्राम. (अ.), एम.जी.आय.एम.एस. सेवाग्राम या केंद्रांवर नि:शुल्क लस दिली जात आहे.
येथे मोजावे लागेल २५० रूपयेआचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे), डॉ. राणे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आर्वी तर लोढा ऑर्थोपेडिक ॲण्ड डेन्टीस हिंगणघाट ही जिल्ह्यातील तीन खासगी लसीकरण केंद्रे असून या ठिकाणी लस घेणाऱ्यांना नाममात्र शुल्क म्हणून २५० रुपये मोजावे लागणार आहेत. असे असले तरी सोमवारी काही तांत्रिक अडचणीमुळे या तिन्ही केंद्रांवरून सोमवारी लसीकरण झाले नाही. लस घेतल्यावर साधारणत: दोन महिन्यांपर्यंत कोणत्याही प्रकारची नशा करता येणार नसून खर्रा, तंबाखू, सिगारेट, दारू आदी सेवनही करता येणार नसल्याचे सांगण्यात आले.
आष्टीतही उत्स्फूर्त प्रतिसादसोमवारी आष्टी येथील शासकीय लसीकरण केंद्रावर लाेकमतने रिॲलिटी चेक केला असता आष्टी शहर व परिसरातील रहिवासी असलेले वयोवृद्ध कोरोनाची लस घेण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येत असल्याचे बघावयास मिळाले.
ॲपमध्ये तांत्रिक अडचणी कायमचदिनेशकुमार श्रीवास्तव तसेच त्यांची पत्नी अनिता श्रीवास्तव या जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा या केंद्रावर कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी आले. दिनेश यांची नोंदणी झाल्याने त्यांना तातडीने लस देण्यात आली. तर अनिता श्रीवास्तव यांचे वय ६० वर्ष एक महिना येत असतानाही नोंदणी होणारे ॲप ते स्वीकारत नव्हते.त्यामुळे त्यांना कोरोनाची लस मिळू शकली नाही. एकूणच नोंदणी होत असलेल्या ॲपमध्ये अजूनही काही तांत्रिक अडचणी कायम असल्याचे बघावयास मिळाले.