आठही पंचायत समितीसमोर ठिय्या वर्धा : प्रलंबित न्याय प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने राज्यात ग्रामसेवकांकडून सोमवारपासून असहकार आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनात वर्धेतील ग्रामसेवकही सहभागी झाले असून त्यांनी वर्धा, सेलू, आर्वी, आष्टी, कारंजा, हिंगणघाट व समुद्रपूर येथील पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे दिले. दरम्यान वर्धेत जि.प. मुख्यकार्यपालन अधिकारी नयना गुंडे यांना निवेदन सादर केले. ग्रामसेवक संवर्गाचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी वेळोवेळी संबंधीतांना निवेदने दिली. हे निवेदन देवून दीड वर्षांचा कालावधी झाला. असे असताना शासनाकडून या मागण्या मार्गी काढण्यात आल्या नाही. केवळ दिलेल्या निवेदनावर चर्चा करण्यात आल्या. बैठकीदरम्यान प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात आश्वासने दिली; परंतु, अद्यापही आश्वासनांची पुर्तता झाली नसल्याने सोमवारपासून असहकार आंदोलन पुकारण्यात आल्याचे संघटनेने कळविले आहे. ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित न्याय प्रश्नांची सोडवणूक करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. ग्रामसेवक संवर्गाच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास १७ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन करण्यात येईल, असेही संघटनेकडून कळविण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्त्व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष कुंदन वाघमारे यांनी केले. आंदोलनात किरण वरघणे, संदीप नागपुरकर यांच्यासह मोठ्यासंख्येने ग्रामसेवक सहभागी होते.(लोकमत न्यूज नेटवर्क ) कामांचा खोळंबा रब्बी हंगामाला प्रारंभ होत आहे. या काळात शेतकऱ्यांना विविध कामांकरिता ग्रामसेवकांची गरज पडते. अशात ग्रामसेवकांच्या या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या कामांचा खोळंबा होत असून गावात ग्रामसेवक मिळत नसल्याने अडचणी निर्माण होत आहे.
ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन
By admin | Published: November 08, 2016 1:43 AM