लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील प्रमुख मार्गाच्या दुतर्फा मागील काही वर्षांत गगनचुंबी इमारती उभारल्या गेल्यात. मात्र, बहुतांश इमारतींमध्ये वाहनतळाची व्यवस्थाच नाही. परिणामी, सार्वजनिक व्यवस्थेवर ताण पडत आहे. यात कारवाई करताना वाहतूक पोलिसांची हतबलताही दिसून येत आहे. याला पालिकेची नियोजनशून्यता कारणीभूत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.मागील काही वर्षांत शहराचा झपाट्याने विकास झाला. एकंदरीत विस्ताराने शहर बेढब झाले. शहरातील प्रमुख मार्गालगत अनेकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले. मात्र, वाहनतळाची कुठेही व्यवस्था करण्यात आली नाही. यामुळे बाजारपेठेत येणारे नागरिक वाट्टेल तेथे वाहने उभी करताना दिसून येतात. वाहनतळच नसल्याने वाहनधारक तरी काय करणार, चक्क अर्ध्या रस्त्यापर्यंत वाहने उभी केलेली आढळून येतात. यात अनेक वाहनचालकांना वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. यात कधीकाळी पोलिसांनाच त्यांचा रोष ओढवून घ्यावा लागतो. भरीस भर बाजारपेठेतील अनेक व्यावसायिक आपल्या दुकानातील साहित्य अर्ध्या ररस्त्यापर्यंत थाटतात. यामुळेदेखील वाहतुकीची दररोज कोंडी होताना दिसते. वर्ष, दोन वर्षांपूर्वी वाहतूक पोलिसांनी व्यावसायिकांवर न्यायालयीन दंडात्मक कारवाई केली होती. यानंतर रस्त्यावर साहित्य थाटण्याचा प्रकार थांबला होता. आता परत हा प्रकार सुरू झाला आहे. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांवर कारवाई करण्यापूर्वी व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे. पालिकेने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.बांधकामांना परवानगी कशी?कुठलेही बांधकाम करण्यापूर्वी नगरपालिकेतील नगररचना विभागात संबंधित बांधकामाच्या नकाशासह इतर कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यानंतरच बांधकामाला रीतसर परवानगी मिळते. अनेकजण नकाशात वाहनतळाची सुविधा दाखवितात. प्रत्यक्षात बांधकामावेळी मात्र वाहनतळाचा समावेश नसतो. याची पालिकेतील नगररचना विभागातील अधिकाऱ्यांकडूनही खातरजमा केली जात नाही. बाजारपेठेतील रस्ते अगोदरच रुंद आहेत. या रस्त्यांवर वाहने बेशिस्तपणे उभी केलेली आढळून येतात. या सर्व बाबींचा ताण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर पडताना दिसतो. वाहनतळाविना होत असलेल्या बांधकामांना परवानगी मिळतेच कशी? असा प्रश्न शहरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.खासगी वाहनांचीही अवैध पार्किंगबाजारपेठेतील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. यातच अनेक व्यावसायिक आपली चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी करतात. यामुळेदेखील वाहतूक व्यवस्था कोलमडण्यास हातभार लागत आहे. याविषयी काही दिवसांपूर्वी तक्रारही करण्यात आली होती. मात्र, वाहतूक पोलिसांनी धनदांडग्यांवर कारवाईचे धाडस दाखविले नाही.
उदंड जाहल्या इमारती, वाहनतळ मात्र नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 10:43 PM
शहरातील प्रमुख मार्गाच्या दुतर्फा मागील काही वर्षांत गगनचुंबी इमारती उभारल्या गेल्यात. मात्र, बहुतांश इमारतींमध्ये वाहनतळाची व्यवस्थाच नाही. परिणामी, सार्वजनिक व्यवस्थेवर ताण पडत आहे. यात कारवाई करताना वाहतूक पोलिसांची हतबलताही दिसून येत आहे.
ठळक मुद्देशहरातील चित्र : सार्वजनिक व्यवस्थेवर पडतोय ताण, पालिकेची नियोजनशून्यता