वर्धा : काळा पैशाला ब्रेक लागावा या हेतूने नोटबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे भाजपा पुढारी सांगत असले तरी ख-या अर्थाने नोटबंदीचा फायदा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाच झाला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी नोटबंदीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात काळा पैसे पांढरा केला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसच्यावतीने गुरूवारी शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन करण्यात आली. मोर्चाचे नेतृत्त्व महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांनी केले.
नोटाबंदीच्या कालावधीत सर्वाधिक जुन्या नोटा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या बँकेत जमा करण्यात आल्या आहे. नोटबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका व त्रास सर्वसामान्य नागरिकांनाच सहन करावा लागला. परंतु, याच कालावधीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत असलेले अमित शाह यांनी आपल्या बँकेत जुन्या नोटा मोठ्या प्रमाणात जमा करून घेतल्या. हा प्रकार कष्टकरी व सर्वसामान्यांच्या जखमांवर मिठ चोळणाराच आहे. त्यामुळे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शहर पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
मगन संग्रहालय भागातील सदभावना भवन येथून निघालेला मोर्चा दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास शहर पोलीस स्टेशन येथे पोहोचला. या आंदोनादरम्यान सदर मागणीचे निवेदन शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत मदने यांना सादर करण्यात आले. मोर्चात महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा हेमलता मेघे, महेश तेलरांधे, काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, माजी नगरसेवक डब्बु शर्मा, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष प्रतिक भोगे यांच्यासह महिला काँग्रेस, एनएसयुआय तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.नोटबंदीच्या निर्णयाचा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या बँकेला सर्वाधिक लाभ मिळाला आहे. त्याबाबतचे पुरावेही पुढे आले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.- चारुलता टोकस, प्रदेशाध्यक्ष, महिला काँग्रेस.