लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र शासनाने १८ पेक्षा जास्त वयोगटातील प्रत्येक व्यक्तीला कोविडची लस देण्याचे निश्चित केले असले तरी राज्य शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून रविवारपासून जिल्ह्यातील तब्बल ३८ केंद्रांवरून ३० पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना केाविड व्हॅक्सिन दिली जाणार आहे. त्यासाठीची संपूर्ण तयारी आरोग्य विभागाने केली आहे.लस तुटवड्यामुळे जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देणे बंद हेाते. तर आता ३० पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ४५ पेक्षा जास्त वयोगटातील जास्तीत जास्त १०० व्यक्तींना तर दुपारी १.३० ते ५ या वेळेत ३० पेक्षा जास्त वयोगटातील जास्तीत जास्त १५० व्यक्तींना प्रत्येक दिवशी लस दिली जाणार आहे. लसीकरण मोहिमेला गती देताना कुठल्याही केंद्रावर नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे.
केंद्रावर ऑनलाईन तसेच स्पॅाट नोंदणीची राहणार सुविधारविवारपासून जिल्ह्यात ३० पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना कोविडची लस दिली जाणार आहे. ही लस घेऊ इच्छिणाऱ्याला ऑनलाईन पद्धतीने तसेच स्पॉट नोंदणी करता येणार आहे. प्रत्येक केंद्रावर जास्तीत जास्त १५० लाभार्थ्यांना लस दिली जाणार असून यात ऑनलाईन नोंदणी करून येणाऱ्या ७५ व्यक्तींचा समावेश राहणार आहे.
मोहिमेने ओलांडला ३.१८ लाखांचा टप्पा-१६ जानेवारीपासून जिल्ह्यात महालसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. आतापर्यंत लसीचे तब्बल ३ लाख १८ हजार ४८६ डोस लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत. यात लसीचा पहिला डोस घेणाऱ्या २ लाख ५४ हजार १०४ तर व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेणाऱ्या ६४ हजार ३८२ लाभार्थ्यांचा समावेश असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात लसीचे ३६,४९० डोस- शासनाकडून नेहमीच कमी लससाठा पाठवून लस कोंडी केल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यात सध्या कोविड प्रतिबंधात्मक लसीचे ३६ हजार ४९० डोस आहेत. आणखी काही लससाठा शासनाकडून वेळीच मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
रविवार २० रोजीपासून जिल्ह्यातील ३८ केंद्रांवरून नियोजित वेळी ३० पेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थ्यांना कोविडची प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. कोरोना मृत्यू रोखण्यासाठी लस उपयुक्त असून नागरिकांनी नजीकच्या केंद्रावर जाऊन लस घ्यावी.- डॉ. प्रभाकर नाईक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.