लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा शहरासह जिल्ह्यात बनावट नंबरप्लेट लावून गुन्हे करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याचे उघडकीस येऊ लागले आहे. त्यामुळे येत्या काळात वाहतूक पोलिसांना हेल्मेट आणि ड्रायव्हिंग लायसन्स तपासून दंड आकारण्याबरोबरच आता बनावट नंबरप्लेट लावून गुन्हेगारी करणाऱ्यांवरही करडी नजर ठेवावी लागणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरात बोगस नंबरप्लेट वापरून शेकडो वाहने धावत आहेत. चोरटे वाहनचोरी केल्यानंतर त्याची मूळ नंबर प्लेट फेकून देतात. त्यावर बोगस अथवा अन्य वाहनांचा नंबर टाकतात. ओळखीचे मॅकेनिक किंवा नातेवाइकांच्या माध्यमातून अर्ध्यापेक्षा कमी किमतीत विक्री करतात. ती चोरीची वाहने शहरात बिनधास्त धावतात. यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांच्या संख्या अधिक आहे. विशेषत: पल्सर गाडीच्या चोरीमध्ये वाढ झाली असून याचा वापर सोनसाखळी चोर आणि लूटमार करणारे आरोपी करतात. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी हिसकावून तसेच लूटमारीच्या घटना घडल्या असून, यामध्ये दुचाकीचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे. अनेक ठिकाणी पोलिसांना गुन्ह्यात चोरीच्या दुचाकीचा वापर झाल्याचेही तपासात पुढे आले आहे. त्यामुळे बोगस नंबरप्लेट पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे.
अनेकांना असते फायनान्स कंपनीची भीती...
अनेक जण फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून वाहने घेतात. व्यवसाय चांगला सुरू असेल तर कर्जाचे हप्ते फेडतात. व्यवसाय डबघाईस आल्यास कर्ज फेडणे मुश्किल होते. अशावेळी कर्जाचे हप्ते रखडले तर फायनान्स कंपन्या वाहन उचलून नेतात. त्यामुळे फायनान्स कंपनीच्या कचाट्यातून वाचविण्यासाठी किंवा कंपनीला गोंधळात टाकण्यासाठी अशी कृप्ती वापरल्या जात असल्याची माहिती आहे.
मूळ मालक त्रस्तनियम तोडल्यावर पोलिसांनी वाहनाचा फोटो काढला तरी दंडाची पावती मूळ वाहन क्रमांकाच्या मालकाच्या घरी पोहचत आहे. त्यामुळे बनावट क्रमांकाच्या वाहनांचे फावत आहे. मूळ मालक दंडाची पावती घेऊन वाहतूक शाखेत येतात. आणि ते वाहन आपले नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आणतात. पोलीस पडताळणी करून चालान रद्द करतात.
वाहनचालकांवर कारवाई करताना जर बनावट नंबरप्लेट आढळून आली तर संबंधित वाहनचालकाला ताब्यात घेत संबंधित पोलीस ठाण्याला माहिती दिली जाते. असे आढळून आल्यास पोलिसांकडून त्याच्यावर कारवाई केल्या जाते.राजेंद्र कडू, वाहतूक पोलीस निरीक्षक, वर्धा
नंबरप्लेट बदलून करत होते शहरात लूटमार...शहरात काही दिवसांपूर्वी एकुर्ली येथील रहिवासी दोन चोरट्यांना रामनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले होते. ते चोरटे वयोवृद्ध पेंशनर्सला निर्जनस्थळी नेत त्यांच्याकडील पैसे हिसकावून नेत होते. पोलिसांनी तब्बल शंभरावर दुचाकींची तपासणी केली असता एका दुचाकीची नंबरप्लेट बोगस आढळून आल्याचे तपासात पुढे आले.