लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरी भागासोबतच आता ग्रामीण भागामध्येही गॅस सिलिंडरचा वापर वाढला आहे. ग्रामीण भागात सिलिंडरचा भडका उडाल्यामुळे चुली पेटायला लागल्य, पण आता या दरवाढीची झळ शहरातही जाणवू लागल्याने घर व फ्लॅटमध्येही चुली पेटवायच्या का? असा संतप्त सवाल गृहिणींकडून विचारल्या जात आहे.कोरोनाकाळात अनेकांना आर्थिक फटका बसला असून ओढाताण करून गाडा रुळावर आणण्याचा प्रत्येकाकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, महागाई पाठ सोडत नसल्याने सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहे. रोजच्या जीवनामध्ये अत्यावश्यक असलेले गॅस सिलिंडरही दरमहा २५ रुपयांनी वाढत असल्याने महिन्याचे बजेट बिघडत आहे. जानेवारी महिन्यापासून १९० रुपयांची दरवाढ झाली असून या महिन्यात ग्राहकांना ९३६.५० रुपयांमध्ये सिलिंडर विकत घ्यावे लागत आहे. दरमहा सिलिंडरची भाववाढ नवा उच्चांक गाठत असून ही दरवाढ अशीच कायम राहिली तर शहरातील घरांमध्येही चुली पेटविल्याशिवाय पर्याय राहणार नाही.
सबसिडी किती मिळते हो भाऊ!
- घराघरामध्ये आता सिलिंडचा वापर वाढला असून या वर्षात तब्बल १९० रुपयांची दरवाढ झाली आहे. दर महिन्याला २५ रुपयांची दरवाढ होत आहे. मात्र, सिलिंडरवर मिळणारी सबसिडी दिवसेंदिवस कमी होत आहे.- यावर्षी जानेवारी महिन्यांपासून ग्राहकांना केवळ ४० रुपये इतकी नाममात्र सबसिडी मिळत आहे. बऱ्याच ग्राहकांच्या खात्यात नियमित जमाही होत नसल्याची ओरड आहे.
व्यावसायिक सिलिंडरही महागले- घरगुती सिलिंडरसोबतच १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरचीही मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे याही सिलिंडरच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस वाढत होत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये १ हजार ७५९.५० रुपयांत मिळणारे सिलिंडर आता १ सप्टेंबरपासून १ हजार ८३४.५० रुपये झाले आहेत. घरगुती सिलिंडरमध्ये २५ रुपयांची वाढ झाली असताना व्यावसायिक सिलिंडरमध्ये ७५ रुपयांची वाढ झाली आहे.
महिन्यांचे गणितच कोलमडले
घराघरांमध्ये गॅस सिलिंडरचा वापर वाढला आहे. आता शहरामध्ये चुली पेटवायला जागाही शिल्लक राहिली नाही. त्यामुळे सिलिंडरशिवाय पर्यायच नाही. अशातच कोरोनाकाळात महागाईचा भडका उडाला. सिलिंडरचे दरही दर महिन्याला वाढतच आहे. त्यामुळे महिन्याचे गणितच बिघडले आहे.माधुरी देशमुख, वर्धा.
कोरोनाच्या महामारीमुळे महिन्याची मिळकतही कमी झाली आहे. अशा दिवसात महागाईचा भडका उडाल्याने घरखर्च करताना मोठी अडचण होत आहे. सिलिंडरचे दरही दर महिन्याला वाढत असल्याने सिलिंडर घेण्यासाठी आधीच तडजोड करावी लागत आहे.पूजा ढोके, वर्धा.