नागरिकांची गैरसोय : कर्मचाऱ्यांच्या कमी संख्येमुळे कामाचा ताण समुद्रपूर : दोन वर्षापूर्वी समुद्रपूर येथे नगरपंचायत अस्तित्वात आली. परंतु अजूनही येथील कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत काळातील जुने वेतन दिले जाते. यात सुटीच्या दिवसाचे वेतन कापले जाते. न.पं. आकृतीबंधानुसार पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडतो. आकृतीबंधानुसार जुन्या कर्मचाऱ्यांना कायम करून उर्वरित जागी नवीन कर्मचारी त्वरित नियुक्त करावे, अशी मागणी नागरिकातून होत आहे. सध्या येथील कर्मचाऱ्यांना १०० ते १५० रूपये रोज याप्रमाणे वेतन दिले जाते. हे वेतन शेतमजूराच्या मजुरीपेक्षाही कमी आहे. महागाईच्या काळात हे वेतन अत्यंत तुटपुंजे असल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहे. अपुरी कर्मचारी संख्या, अल्पवेतन व कामाचा ताण यामुळे नागरी सेवा, सुविधा व कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होऊन नागरिकांची गैरसोय होताना दिसते. त्यामुळे येथे कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी नागरिकातून होत आहे. दोन वर्षापूर्वी तालुका स्थळ म्हणून समुद्रपूर ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा प्राप्त झाला. दर्जा वाढला तसे कामही वाढले. परंतु वेतनाचा दर्जा वाढण्याची कर्मचाऱ्यांची अपेक्षा अद्याप पूर्ण होताना दिसत नाही. याउलट नगरपंचायतीच्या नियमानुसार सुटीच्या दिवसांचे वेतन कपात केले जाते. यापेक्षा ग्रामपंचायतच बरी होती, असे म्हणण्याची वेळ येथील कर्मचाऱ्यांवर आली आहे. नगरपंचायतच्या आकृतीबंधानुसार वीस कर्मचारी आवश्यक असताना येथे फक्त अकरा कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये जुने आठ कर्मचारी व रोजमजुरी प्रमाणे काम करणारे नवीन तीन कर्मचारी अशी संख्या आहे. नगरपंचायतीला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळण्यास आठ महिन्यांचा कालावधी लागला. आता आकृतीबंधानुसार पूर्ण कर्मचारी उपलब्ध होण्यास आणखी किती कालावधी लागेल असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात. तालुक्याचे स्थळ असल्याने मागील काही वर्षामध्ये शहराच्या लोकवस्तीत बरीच वाढ झाली आहे. त्यामुळे नागरी सेवा व सुविधांबाबतची मागणी वाढली आहे. त्यामुळे येथे आकृतीबंधानुसार कर्मचारी उपलब्ध करुन देणे गरजेचे ठरत आहे. शहरातील विविध वॉर्डात अस्वच्छता आढळते. जनावरांच्या कोंडवाड्याकडे लक्ष द्यायला कर्मचारी नाही. पाणीपुरवठा वेळेत सुरू होत नाही. यासोबतच नागरिकांची कार्यालयीन कामेही प्रभावित होत आहे. आकृतीबंधानुसार कर्मचारी उपलब्ध असल्यास नागरिकांच्या समस्या वेळेत निकाली निघु शकतात. (शहर प्रतिनिधी)
न.पं. कर्मचारी तुटपुंज्या वेतनावर
By admin | Published: April 06, 2017 12:16 AM