चार महिन्यांपासून वेतन नाही : शुक्रवारपासून जाणार संपावर आर्वी: येथील नगरपालिकाची निवडणूक काही महिन्यांवर असताना येथील कर्मचाऱ्यांना गत चार महिन्यांपासून वेतन नाही. यामुळे या कर्मचाऱ्यांनी मंगळवार पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शुक्रवारपासून सर्वच कर्मचारी संपावर जाणार असा इशारा त्यांनी दिला आहे. आर्वी नगरपालिकेत जवळपास १५ कोटी रुपयांचा विकासनिधी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिला. त्याचे भूमिपूजन आर्वी शहरात झाले; मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे गत चार महिन्यांपासून वेतन झाले नाही. याकडे लक्ष देण्याकरिता कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळ नसल्याचे दिसून आले. यामुळे या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याकरिता या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. वेतनाअभावी या कर्मचाऱ्यांची कोंडी झाली असून त्यांना बाजारातून उधार मिळणे कठीण झाले आहे. वेतन नसल्याने त्यांची अनेक कामे रखडली आहेत. यामुळे न.प. कर्मचारी संघटनाचे अध्यक्ष संजय अंभारे, सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष सुशील चावरे आदी सर्व कर्मचारी वृंदानी आर्वी शहरातील नागरिकांसाठी जाहीर सूचनाचे पत्रके वाटली. त्या पत्रकात मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने बेमुदत संपावर आम्ही जात असून नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल क्षमा करावी, असे नमूद केले आहे. आ. अमर काळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. येथील शिवाजी चौकात संघटनेचे अध्यक्ष संजय अंभोरे, नरेंद्र मानकर व इतर काही कर्मचाऱ्यांनी मंगळवार (ता.१६) पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारपासून नगरपालिकेचे सर्व कर्मचारी मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संपावर जात असल्याचे जाहीर सूचनेच्या पत्रकात नमुद आहे. कर्मचाऱ्यांचे थकित वेतन विनाविलंब द्यावे. दर महिन्याचे सात तारखेला न चुकता वेतन करावे, वेतनातून होणाऱ्या सर्व कपाती संबंधित विभागाला वेतनासह दरमाह पाठवावी. रोजंदारी कर्मचारी यांना त्वरित न.प. सेवेत कायम करण्याचे आदेश तामील करावे. सफाई कामगारांना १२ वर्षांची कालबद्ध परिस्थितीची बकाया रक्कम एकमुस्त द्यावी. पेंशनधारक व निवृत्ती वेतन धारक यांना निवृत्ती वेतनाचा थकित असलेला बकाया एकमुस्त द्यावा, अशा मागण्या आहेत.(तालुका प्रतिनिधी)
वेतनाकरिता न.प. कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण
By admin | Published: August 19, 2016 2:10 AM