लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सलग चौथ्या दिवशी जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोविड बाधित सापडल्याने जिल्ह्यातील ॲक्टिव्ह कोविड बाधितांची संख्या आता १४३ झाली आहे. शनिवारी ६६ नवीन कोविडबाधितांची भर पडली असली, तरी सहा रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे.जिल्ह्यात अद्याप ओमायक्रॉनचा एकही रुग्ण ट्रेस झाला नसला, तरी मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या संख्येनेच नवीन कोविडबाधित सापडत आहेत. ५ जानेवारीला १४, ६ जानेवारीला २१, तर ७ जानेवारीला ४२ नवीन कोविडबाधित सापडल्याने प्रशासनासह नागरिकांत दहशत असतानाच शनिवार ८ जानेवारीला जिल्ह्यात तब्बल ६६ नवीन कोविडबाधितांची नोंद घेण्यात आली आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात ६६२ व्यक्तींची कोविड चाचणी केली असता, त्यापैक ६६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर सहा रुग्णांनी शनिवारी कोविडवर विजय मिळविला आहे.
३६ व्यक्तींना तीन रुपयांच्या मास्कसाठी प्रत्येकी मोजावे लागले २०० रुपये; दंडात्मक मोहीम सुरूवर्धा : मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या संख्येने नवीन कोविड बाधित सापडत आहेत. असे असतानाही अनेक व्यक्ती घराबाहेर विनामास्कच पडत असल्याने विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. याच सूचनांनुसार वर्धा नगरपालिका प्रशासनाकडून मुख्याधिकारी राजेश भगत यांच्या नेतृत्वात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी विशेष चमू तयार करण्यात आला असून, याच चमूतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी मागील २४ तासांत विनामास्क फिरणाऱ्या ३६ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोविड संकट काळात दंडात्मक कारवाईस पात्र ठरलेल्या या ३६ व्यक्तींना प्रत्येक २०० रुपये दंड ठोठावण्यात आला असला तरी त्यांना ३ रुपये किमतीचे मास्क देऊन ‘घराबाहेर पडताय, मग मास्कचा वापर करा’ असे पटवून देण्यात आले आहे. ही कारवाई वर्धा नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेश भगत यांच्या मार्गदर्शनात निखिल लोहवे, विशाल सोमवंशी, स्वप्नील खंडारे, गजानन पेटकर, विशाल नाईक यांनी केली.