स्मिता पाटील : शासकीय नर्सिंग स्कूलमध्ये परिचारिका दिनवर्धा : मानवाची सेवा करणे हे श्रेष्ठ कार्य आहे, तर रूग्णांची सेवा करणे हे सर्वश्रेष्ठ काम आहे. रूग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. ही सेवा करण्याची संधी तुम्हाला परिचारिका म्हणून प्राप्त झाली आहे. या संधीचे सोने करा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील यांनी व्यक्त केले.गुरुवारी जागतिक परिचारिका दिन, शासकीय नर्सिंग स्कूलच्या सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून स्मिता पाटील बोलत होत्या, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी तर अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, सामन्य रूग्णालयाच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनीता दीक्षित, सा. बा. चे शाखा अभियंता, हिवरे, नायब तहसीलदार पराशर, अधिपरिचारिका फुनसे, नर्सिंग स्कूल चे मेट्रन्स उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात फ्लोरेन्स नाईटींगल यांना अभिवादन करून करण्यात आली. सन २०१५-१६ या वर्षातील विद्यार्थिनींना परिचारिका या व्यवसायाची शपथ देण्यात आली. रूग्णालयात प्रत्येक घटकांचे स्वतंत्र कार्य असते. डॉक्टरांचे कार्य जसे इतर कोणीही करू शकत नाही, तद्वतच परिचारिकांचे कार्य सुद्धा दुसरे कोणीही करू शकत नाही. त्यांच्या कार्याया पर्याय नसतो. त्यामुळे डॉक्टर व नर्स यांच्या समन्वयातूनच आरोग्य सेवा पूर्णत्वास होते, असे मनोगत डॉ. मडावी यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. परिचारिका म्हणून सेवा देताना आपुलकी, शांतचित्त व संयम ठेवूनच सेवा दिली पाहिजे. रूग्णालयात केवळ रूग्णच नाही तर त्यांचे कुटुंबीय व इतर नातेवाईकही असतात. या सर्वांच्या मानसिकतेचा विचार सेवा देताना करावा लागतो, असे डॉ. चव्हाण यावेळी म्हणाले. वर्षभरामध्ये या संस्थेत विविध स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थिनीचा सत्कार प्रमुख पाहण्यांच्या हस्ते करण्यात आला. यात प्रामुख्याने मनीषा बावणे, प्रगती साळवे, निकिता घावट, प्रियंका वांंडकर, तेजस्वीनी वाटमोडे, प्राची पाटील, प्राची पाटील, प्रियंका यावलकर यांचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त परिसेविका कापसे या दरवर्षी या कार्यक्रमाकरिता देणगी देतात. त्यांचाही सत्कार पाहण्यांच्या हस्ते करण्यात आला. सहारकर, खुजे व ढोबळे यांनी गीत सादर केले. संचालन पाठ्य निर्देशिका शीतल यावले यांनी तर आभार पद्मा मुगल यांनी मांडले. कार्यक्रमाला जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी दिलीप रहाटे, बाबाराव कनेर, हरीश पाटील, उदय साळवे, चंद्रजित टागोर, हरडे, गंधे, कल्पना टोणे, नर्सिंग स्कूल व सामान्य रूग्णालय वर्धा येथील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.(शहर प्रतिनिधी)
परिचारिकांनी रुग्णसेवेच्या संधीचे सोने करावे
By admin | Published: May 14, 2016 2:04 AM