लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा,पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा, समुद्रपूर तालुक्यात या म्हणीच्या उलट झाले आहे. पावसाळा सुरू झाला तरी समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे तालुक्यात पाऊसच खोटा झाल्याची सध्याची परिस्थिती आहे. पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. सोयाबीन, तूर, कापूस पिकांना पावसाची गरज होती. गेल्या तीन-चार दिवसात थोडा का होईना पाऊस बरसल्याने शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तालुक्यातील सर्वच लहान-मोठे प्रकल्प अजून ये रे ये रे पावसाच करीत आहेत. तालुक्यात सध्या केवळ पिकांना पुरेसा असा पाऊस बरसला. मात्र दमदार पाऊस होऊन नद्यांना पूर गेला, असा पाऊस कुठे पडला नाही. सध्या जुलै सुरू आहे. अजूनपर्यंत तालुक्यातील प्रकल्पांच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. शेतकऱ्यांना खरीप हंगाम सध्यातरी बरा आहे. पुढे अशीच परिस्थिती राहिली तर रब्बी हंगामात चांगलीच दमछाक होणार आहे. तालुक्यातील सर्वच मध्यम प्रकल्पाची परिस्थिती सध्यातरी एवढी चांगली नाही. तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त फरक नाही. तालुक्याला पाणीपुरवठा करणारा लालनाला, पोथरा प्रकल्पाची पातळी अद्याप २५ टक्क्यांच्या खालीच आहे. त्यामुळे उन्हाळ्यात समुद्रपूर तालुक्यात व ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही, एवढा पाऊस होऊन गरजेचे आहे. यावर्षी सुरुवातीपासून पावसाने हुलकावणी दिली. दोन-तीन दिवसांपासून राज्यात पावसाने परत जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रकल्प हाऊसफुल्ल झाले आहेत.मात्र, तालुक्याव्यतिरिक्त इतर ठिकाणीच पाऊस बरसत असल्याने या तालुक्याला वरुणदेवाने या यादीतून वगळले काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ऑगस्टमध्ये दमदार पाऊस आला तर शहरासह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होईल. मात्र, सध्या पावसाला जोर नसल्याने विहिरींची पातळीसुद्धा वाढलेली नाही. तर प्रकल्पाचे दिवास्वप्न पाहणे चुकीचे ठरेल. खरिपाच्या पिकांची स्थिती आतापर्यंतच्या पावसाने चांगली झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर आतापर्यंत झालेल्या पावसाने समाधानी असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, अजूनही आठवडाभरात दमदार पाऊस पडला नाही तर पुढील काळात नागरिकांसह प्रशासनाच्या डोळ्यात नक्की पाणी येईल.