राजेश सोळंकीलोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद होती. मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू होते. त्यामुळे मुले तासन् तास मोबाइल खेळत होते. कार्टुन गेम, सोशल मीडिया मनोरंजन आदी नवीन साधनांची ऑनलाइन अभ्यासासोबतच त्यांना सवय लागली. स्क्रीन टाइम वाढल्याने मुलांचे मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला होता. अशातच आता ऑफलाइन शाळा सुरू झाल्या असूनही मुलांजवळ मोबाइल राहत असून, मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होतो आहे. शाळा ऑफलाइन सुरू झाल्या असल्या, तरी आता अनेक विद्यार्थ्याकडे सुरक्षा काळजी नावाखाली सर्रास मोबाइल दिसत आहे, त्यामुळे त्याचा दुष्परिणाम होण्याची भीती आता व्यक्त केला जात आहे.
सर्व शाळा झाल्या सुरू... म्हणून लागतो मुलांना मोबाइल... आता सर्वच शाळा सुरू झाल्या असल्या, तरी एसटी बंद असल्याने मुलांना खासगी वाहनाने शाळेत येणे-जाणे करावे लागते. त्यामुळे मुलांना काही अडचण आल्यास संपर्क, माहितीसाठी मोबाइल द्यावा लागतो, असे पालकांचे म्हणणे आहे. मात्र, मुलांची सवय टोकाला जाईपर्यंत पालकांनी प्रतीक्षा करू नये. सुरुवातीपासूनच याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
शाळेत मोबाईल नकोच......ऑनलाइनमुळे आता मोबाइलची सवय मुलांना झाली. पालकही आता दुर्लक्ष करतात. शाळेत आल्यावर मुलांचे प्रत्यक्ष वर्गात लक्ष लागत नाही. काय मेसेज आला, कुणी काय पाठविले, याकडे त्यांचे लक्ष राहते. चॅटिंग करत राहत असल्याने शाळेत मोबाइल नकोच. मुलांच्या मोबाइल सवयीवर पालकांनी नियंत्रण ठेवायला हवे.- साहेबराव अवथळे, प्राचार्य.
आधी मुलांना काही वेळेसाठीच मोबाइल मिळत होता. शाळा, महाविद्यालय, क्लासेस, मैदानावरील खेळ यात मुलांचा वेळ जात होता. कोरोना काळात मोबाइल स्क्रीनकडे मुले अत्यंत जवळ आली आहे. प्रत्यक्ष माणसाशी ते दूर गेल्याचे चित्र होते. आता शाळा सुरू झाल्या असल्याने, मोबाइलची सवय तोडणे आवश्यक असून, शाळेत येताना पालकांनी मुलांना मोबाइल देऊ नये.- संजय नांदे, मुख्याध्यापक.
मुलांची काळजी म्हणून दिला मोबाईल...कोरोनात शाळा बंद होत्या ऑनलाइन क्लासेस होते, त्यामुळे त्यांचा स्क्रीन टाइम वाढलेला होता. आता मुलांना त्याची सवय झाली आहे, ही सवय आता बदलण्यासाठी पालकांना आता मेहनत घ्यावी लागेल, परंतु दुसरी बाब अशी की, मुले शिकण्यासाठी शहरात जातात काही अडचण आली, तर कसे करावे, म्हणून त्यांना मोबाइल दिला आहे.- संजय देशमुख, पालक.
मोबाइलवर मर्यादा आणणे आता आवश्यक आहे, परंतु आता बस नाही, खासगी वाहनाने, दुचाकीने मुले शाळेत जातात, त्यामुळे काळजी वाटते. त्यामुळे त्यांच्याकडे मोबाइल दिला आहे.- रवि वानखेडे, पालक.