वर्धा : येथील शेत शिवारातील मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी महावितरणच्या वीज रोहित्राला लक्ष्य केले असून एका महिन्यात आतापर्यंत चार रोहित्रातले ऑईल चोरून नेले आहे. परिणामी या परिसरातील अनेक वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यात महावितरणला अडचण निर्माण झाली आहे.
दुर्गापूर माैजातील १५ शेतकऱ्यांचा वीजपुरवठा यामुळे बंद आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून पिकांना पाणी देणे गरजेचे असतांना ऐन हंगामातच वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरणकडून येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
आपला जीव धोक्यात घालून चोरटे आपला कार्यभाग साधत आहेत. या परिसरातील शेती पंपाला वीज पुरवठा करण्याऱ्या विद्युत रोहित्राला चोरट्यांनी आपले लक्ष्य केले असून एका महिन्यात ८०० ते १००० लीटर ऑईल चोरट्यांनी चोरून नेले आहे. तेव्हा शेतकऱ्यांसोबतच महावितरणला देखील अखंडित वीज पुरवठा ठेवताना नाकीनऊ येऊ लागले आहेत.
चालू वीज रोहित्र बंद करून. यातील ऑईल चोरुन चोरटे पसार होतात. एका महिन्यात तळेगाव परिसरात अशाप्रकारच्या आतापर्यंत ४ रोहित्रांतील ऑईल चोरीच्या घटना घडल्या असून या आधीसुद्धा अनेकवेळा अशाप्रकारच्या घटना परिसरात घडल्या आहेत. यात महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व प्रकरणात महावितरणकडून रितसर पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु आतापर्यंत झालेल्या रोहित्रातील ऑईल चोरीचा एकही तपास लागला नसल्याने चोरट्यांना चांगलेच फावले आहे.
चालू वीज वाहिनीवर काम करणे हे धोकादायक आहे. पण चोरटे आपला जीव धोक्यात घालून आपला कार्यभाग साधत आहेत. ग्रामीण भागातील शेती पंपाला वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेचे जाळे निर्माण केले आहे. शेती पंपाना वीजपुरवठा करणारे रोहित्र बहुतांश ठिकाणी निर्जन आणि निर्मनुष्य ठिकाणी असल्याने चोरांना चोरी करणे सोपे झाले आहे.