वर्धा : सेलू तालुक्यातील पहेलानपूर येथील रोहीत्र तीन महिन्यांपूर्वी जळाले होते. तेव्हापासून रोहित्राची दुरुस्ती केली नाही. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे ओलिताचे काम ठप्प झाले आहे. आॅक्टोबरचा ‘हीट’ मुळे कपाशी, सोयाबीन, तूर आदी पीके करपत असल्याने पिकांना ओलित करणे आवश्यक आहे. पावसाने महिनाभरापासून दडी मारली असल्याने पिकांना पाणी न दिल्यास ती सुकण्याचा धोका आहे. मात्र वीजपुरवठा नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे. याबाबत वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांच्याकडे तक्रार नोंदवली. मात्र रोहित्राची दुरुस्ती करुन वीज पुरवठा पूर्ववत करण्याची तसदी घेतली गेली नाही. यामुळे शेतकऱ्यांना नाहक नुकसान सोसावे लागत आहे. याबाबत वीज वितरण विभागाकडे तक्रार करुनही उपयोग होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले. यंदा पावसाने विलंबाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. यानंतर कसेबसे करुन पिकांना वाचविले आता. मात्र सर्व साधणे उपलब्ध असताना पीक वाचविणे शक्य नसल्याने हाती आलेले पीक गमावण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे. तीन महिन्यांपासून रोहित्र बंद आहेत मात्र त्याची दुरुस्ती केली जात नाही. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांकडे देयक थकीत असल्यास वसूली करीता तगादा लावतात.मात्र ही तत्परता तक्रारींचा निपटारा करण्यात दाखवली जात नाही. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे ग्राहक त्रस्त झाले असून घरगुती उपकरणे यामुळे प्रभावित होतात. मात्र वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना याचे सोयर सूतक नसल्याचे दिसून येते. अनेकदा तक्रार करूनही तांत्रिक बिघाडाची दुरूस्ती केली जात नसून समस्या जैसे थे राहत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देत त्वरीत कारवाई करावी अशी मागणी होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
रोहीत्र बंद असल्याने ओलित ठप्प
By admin | Published: October 12, 2014 11:47 PM