सेलू (वर्धा) : पाच हजारांऐवजी केवळ तीनच हजार रुपये दिल्याच्या कारणामुळे घोराड येथील ५८ वर्षीय वृद्धास पोलिस कर्मचाऱ्याने जबर मारहाण केली. मधुमेहाच्या आजाराने पीडित असलेला वृद्ध मारहाणीनंतर अत्यवस्थ झाल्याने तीन दिवस अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागले. त्यामुळे पैशासाठी वाट्टेल ते करणाऱ्या ‘त्या’ पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी पीडितासह कुटुंबातील सदस्यांनी पत्रकार परिषदेतून केली. कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक आता याप्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घोराड येथील गोविंद जाधव यापूर्वी अवैध व्यवसाय करायचे, परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून मधुमेहाच्या आजारामुळे त्यांनी अवैध व्यवसायाला कायमस्वरूपी रामराम ठोकला. त्यांचा अवैध व्यवसाय सुरू असावा, या उद्देशाने सेलू पोलिस ठाण्यातील विजय कापसे नामक कर्मचारी रविवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या घरी पोहोचला. यावेळी ते स्वत: देखील मद्यधुंद अवस्थेत होते हे विशेष. त्यांनी जाधव यांना ‘पाच हजार रुपये दे, अन्यथा तुला अंदर टाकतो’, असे म्हणून त्यांना आपला पोलिसी खाक्या दाखवला. परंतु, त्यांचा व्यवसायच ठप्प असल्याने त्यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शविली.
हाच राग मनात धरून कापसे यांनी त्यांना फरफटत पोलिस ठाण्यात नेले. तेथील आपल्या क्वार्टरमध्ये आत नेले आणि ‘सांग पैसे देते का, ठोकू केस’ म्हणून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे घाबरलेल्या जाधव यांनी आपल्या घरी फोन करून कसेबसे तीन हजार रुपये आणून कापसे यांना दिले. परंतु, त्याची हाव काही संपतच नव्हती. त्यांनी जाधव यांना खाली जमिनीवर पाडले आणि बुटाच्या साहाय्याने त्यांच्या पाठीवर आणि हाताला मारहाण केली, असा आरोप पत्रकार परिषदेत केला.
जाधव आधीच मधुमेहाच्या आजाराने बाधित असल्याने आणि वेळेवर इन्सुलिन न मिळाल्याने ते पोलिस ठाण्यातच अत्यवस्थ झाले. शेवटी कुटुंबातील सदस्यांनी पोहोचून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी सेवाग्रामला हलविण्याच्या सूचना केल्याने सेवाग्रामला दाखल करण्यात आले. तीन दिवसांपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पत्नी व मुलगी तक्रार देण्याकरिता पोलिस ठाण्यात गेल्यानंतर रात्रभर ताटकळत ठेवून पहाटे चार वाजता कशीबशी तक्रार दाखल करून घेतली, असेही यावेळी सांगण्यात आले.
यादरम्यान तेथे उपविभागीय पोलिस अधिकारी देखील येऊन गेल्याचे कळते. अद्याप याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या हप्तेखोर, निर्दयी पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी पीडित परिवारातील सदस्यांनी पत्रकार परिषदेतून केली. या घटनेशी संबंधित मारहाणीचा आरोप असलेले पोलिस कर्मचारी विजय कापसे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी चार वेळा भ्रमणध्वनीवर संपर्क साधला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
‘धंदा करा आणि हप्ता द्या’, अवैध धंद्यांना घालताहेत खतपाणी?
अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक अहोरात्र प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांचेच काही कर्मचारी प्रामाणिक प्रयत्नांना गालबोट लावत आहेत. कारवाईच्या नावाखाली स्वत:च दारू ढोसून आपला रुबाब झाडत आहे. ‘धंदा करा आणि हप्ता द्या’ यासाठी पोलिसच अवैध व्यवसायाला खतपाणी घालत असल्याचे चित्र आहे. मध्यंतरी येथील कोणता पोलिस कर्मचारी अवैध व्यावसायिकांकडून किती रक्कम घेतो, याची ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल झाली होती. तरीही सर्व काही ‘ऑल इज वेल’ असल्याचे भासविले जात असून हा प्रकार कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षकांच्या प्रामाणिकतेला नख लावणारा आहे.
घटनेच्या दिवशी मी पोलिस ठाण्यात नव्हतो. तशीही माझी आता बदली झाली आहे. सध्या मी समृद्धी मार्गावर बंदोबस्तात आहे. त्यामुळे याप्रकरणी मला काही सांगता येणार नाही.
- रवींद्र गायकवाड, ठाणेदार, पोलिस स्टेशन, सेलू.