कारंजा (घा.) : संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळावा म्हणून वृद्ध व्यक्तींना परिसरातील नागरिकांना तहसील कार्यालयाच्या वारंवार हेलपाट्या माराव्या लागत आहेत़ ग्रामीण भागातून तालुकास्थळी येणाऱ्या गरजू नागरिकांना येरझारा मारणे कठीण जात आहे. प्रकरणे मंजूर होण्यातही अनंत अडथळे निर्माण होत आहेत़तहसील कार्यालयाच्या परिसरात वृद्ध व्यक्ती मोठ्या संख्येने ताटकळत बसून असल्याचे चित्र रोजच पहायला मिळते़ काही वृद्धांशी संपर्क साधला असता आम्ही श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळावा, याकरिता आलेलो आहोत़ मात्र पटवारी दर तीन दिवसांनी बोलावतो़ आम्हाला २० ते ३० किलोमीटर अंतरावरील गावावरुन येथे यावे लागते़ गावापासून अत्यल्प बसफेऱ्या असल्यामुळे, खासगी वाहनांनी दामदुप्पट पैसे आकारुन यावे लागते. येथे आल्यावर उत्पन्नाच्या प्रमाणपत्राकरिता पुढची तारीख दिली जाते. अशा अनेक चकरा झाल्या आहेत. विचारणा केली तर बैठकीचे कारण पुढे केले जाते, असे वृद्ध सांगतात. श्रावणबाळ योजनेकरिता आम्हाला वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र मिळाले, मात्र जे आमच्या गावात येतात, त्यांच्याकडून प्रमाणपत्र मिळविण्याकरिता हेलपाट्या माराव्या लागत असल्याचेही नागरिक सांगतात. श्रावणबाळ योजनेत अद्याप समावेश करण्यात न आल्याने या वृद्धांनी आर्थिक कुंचबना होत आहे.(शहर प्रतिनिधी)
श्रावणबाळ योजनेकरिता वृद्धांची ससेहोलपट
By admin | Published: December 31, 2014 11:30 PM