बोर येथील विनयभंग प्रकरण : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अहवालानंतर निर्णय वर्धा : आदिवासी युवतीचा विनयभंग प्रकरणातील आरोपी सेलूचा उपनिरीक्षक राजू चौधरीला शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. न्यायालयात सादर करताच चौधरीने पोलिसांनी बळजबरीने आणल्याचे बयाण दिले. यामुळे न्यायाधीश अनिरुद्ध चांदेकर यांनी चौधरीच्या आरोग्याची तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सकांकडून करून अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सूचना पोलिसांना केल्या. यानुसार पोलिसांनी अहवाल सादर करताच न्यायाधिशांनी सायंकाळी हा निर्णय दिला. अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या राजू चौधरीला गुरुवारी रात्री ताब्यात घेण्यात आले. तेथून त्याला वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. त्याला आणताना तेथील खासगी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्याची प्रकृती ठिक असल्याचा अहवाल घेण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी त्याला उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात हजर करीत त्याच्या अटकेची कार्यवाही पूर्ण करून दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने अॅड. अनुराधा सबाने यांनी राजू चौधरीला पोलीस कोठडीची मागणी केली. यावर चौधरी याने आपली प्रकृती ठिक नसताना पोलिसांनी जबरदस्तीने आणल्याचे न्यायालयात सांगितले. न्यायाधीश चांदेकर यांनी चौधरीची जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी करून अहवाल तत्काळ न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले. या अहवालावर चौधरीची पोलीस कोठडी वा जामिनाचा निर्णय ठरणार होेता. न्यायालयाच्या आदेशानुसार तपासी अधिकारी एसडीपीओ संतोष वानखेडे यांनी चौधरीला जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीकरिता नेले; मात्र शुक्रवारी जिल्हा शल्य चिकित्सक नागपूर येथे गेल्याचे समोर आले. यामुळे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भिसे यांनी तपासणी करीत चौधरी दाखल करण्यायोग्य नसल्याचा अहवाल दिला. (प्रतिनिधी)तिसरा आरोपीही प्रकटला या प्रकरणात तिसरा आरोपी कोणी मोठा अधिकारी असल्याची चर्चा होती. तो पोलिसांच्या हातापासून दूर होता. गुरुवारी अचानक एसडीपीओ कार्यालयात हा तिसरा आरोपी प्रकटला. बोरधरण येथील आदिवासी युवतीच्या विनयभंग प्रकरणात पोलिसांना आवश्यक असलेला तिसला आरोपी अचानक पोलिसांसमोर आल्याने सारेच अवाक् झाले. हा तिसऱ्या आरोपीने गुरुवारी थेट उपविभागीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात येत अटकपूर्व जामीन अर्ज अधिकाऱ्यांना दिल्याने चांगलीच तारांबळ उडाली. मोहनीश संजय काळे रा. छत्रसाल नगर, अमरावती असे या तिसऱ्या आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा मोहनीश उपनिरीक्षक चौधरी याच्या खासगी गाडीचा चालक आहे. त्याला अमरावती येथून चौधरी सेलू येथे बोलवायचा. जबलपूर येथे जायचे आहे, असे सांगून घटनेच्यया दिवशी त्याला सेलू येथे बोलविण्यात आले होते. दिवशी नियोजित कार्यक्रम रद्द झाल्याने मोहनीश हा पोलीस उपनिरीक्षक चौधरीसोबत बोरधरण येथे पोहोचला व त्या कृत्यात सहभागी झाला. मोहनीश तपासात समोर आला नव्हता; पण त्याने अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल करून न्यायालयाने दिलेला लिफाफा तपास अधिकारी संतोष वानखडे यांच्याकडे गुरूवारी आणून दिला. शुक्रवारी त्याच्या अंतरीम जामिनावर निर्णय होणार होता. मात्र आज त्याच्या अर्जावर सुनावणी झाली नसून त्याला पुढची तारीख देण्यात आल्याची माहिती आहे.१४ जून रोजी बोरधरण येथे सेलू पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक असलेल्या चौधरीने केलेला पराक्रम तरूणीच्या तक्रारीनंतर चर्चेत आल्यावर एकच खळबळ उडाली. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकासह वाहनचालक व इतर एकाविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणातील दोन आरोपी सापडल्यावर तिसरा कोण, हा प्रश्न कायम होता. त्यातच हा तिसरा आरोपी मोठा साहेब, असल्याचे सांगितल्या जात होते. त्यामुळे रहस्य अधिकच वाढले होते. (प्रतिनिधी)
‘त्या’ उपनिरीक्षकाला एक दिवसाची पोलीस कोठडी
By admin | Published: July 18, 2015 1:51 AM