अनिल सोले : आर्वीत अवतरली वृक्षदिंडीची मांदियाळी लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मागील वर्षी आपण २ कोटी ८२ लाख वृक्ष लागवड केली. आता ४ कोटी, त्यानंतर १३ कोटी आणि त्यापुढे ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प आहे. एक झाड आपल्याला रोज २१०० रुपयांचे आॅक्सिजन मोफत देते आणि आपण त्याची परतफेड म्हणून काय देतो? असा सवाल करीत आ.प्रा अनिल सोले यांनी एकच लक्ष्य, चार कोटी वृक्ष, हा नारा दिला. महाराष्ट्र शासनाच्यावतीने १ ते ७ जुलै दरम्यान चार कोटी वृक्षारोपण करण्याची मोहीम राबविली जात आहे. या अभियानाच्या संकल्प पूर्तीसाठी ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनतर्फे २२ जून रोजी चंद्रपूर येथून वृक्षदिंडी जनजागृती चेतना यात्रा काढली आहे. ही वृक्षदिंडी सोमवारी वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा), तळेगाव, आर्वी व पुलगाव येथे पोहोचली. आर्वी येथील वृक्षदिंडीच्या स्वागत व संकल्प सभेत आ.प्रा. सोले बोलत होते. ते पूढे म्हणाले की, आजपासून २० वर्षांपूर्वी आपल्याला कुणी पाणी विकत देतो, असे म्हंटले असते तर लोक हसले असते; पण आज परिस्थिती बदलली आहे. आपण रेल्वे स्टेशनवर गेलो असता लोक नळावर पाणी भरताना दिसत नाही. थेट पाण्याची बॉटल विकत आणतात. म्हणजे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. पूर्वी आपण विहिरीचे पाणी गाळून पीत होतो. त्याच विहिरी आज कचरा गोळा करण्याचे साधन झाले आहे. आपल्या आजोबांच्या काळात ५० फुटावर पाण्याचा भूगर्भ साठा होता. वडिलांच्या काळात १०० फुटावर, आपल्या काळात २०० फुटावर गेला तर आता नातवाच्या काळात भूगर्भात पाणीच शिल्लक राहणार नाही. यापूर्वी शासनाने याबाबत पाणी अडवा पाणी जिरवा, अशा योजना केल्या; पण त्यात लोकसहभागाचा अभाव जाणवल्याने जनतेने त्याची खिल्ली उडविली आणि याला अडवा न त्याले जिरवा, अशी स्थिती निर्माण झाली. यात लोकसहभाग नसल्याने ही योजना अपयशी ठरली. यासाठी वृक्ष लागवड योजना लोकचळवळ होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. आ. सोले यांचे अभिनंदन व स्वागत करण्यासाठी नागरिक, शाळकरी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. कारंजा (घा.) येथे गोळीबार चौकात वृक्षारोपण करण्याबाबत सभा झाली. तळेगाव येथेही नागरिकांनी वृक्ष लागवडीचा संकल्प केला. आर्वी येथे शिवाजी चौकात जाहीर वृक्षारोपण संकल्प सभा झाली. पुलगाव येथे न.प. सभागृहात वृक्षदिंडी संकल्प सभा पार पडली. याप्रसंगी जिल्ह्याला १२ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य असून ते पूर्ण करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असा निर्धार सहायक उपवनसंरक्षक बडेकर यांनी व्यक्त केला. वृक्षदिंडीच्या कार्यक्रमात प्रत्यकाने एक तरी झाड लावावे व झाडाची कत्तल करणार नाही, अशी शपथ देण्यात आली. संकल्प सभेमध्ये वृक्षारोपण करून वृक्षांचे संवर्धन करण्याचा संदेशही देण्यात आला.
एकच लक्ष्य, चार कोटी वृक्ष
By admin | Published: June 28, 2017 12:54 AM