१४ दिवसांत २८ मोकाट जनावरे बंद महेश सायखेडे । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांची चांगलीच गर्दी असल्याचे दिसून आले आहे. मालकांकडून मोकाट सोडलेली जनावरे रस्त्यावर आल्याने अपघाताची शक्यता बळावत आहे. यावर उपाय म्हणून पालिकेकडून ही जनावरे पकडण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. यात पकडलेल्या एका जनावराच्या चारापाण्यापोटी पालिकेला तब्बल दीडशे रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. पालिकेच्यावतीने पकडण्यात आलेली जनावरे पिपरी (मेघे) येथील पिपल्स फॉर अॅनिमलच्या करूनाभश्रमात देण्यात येत आहे. येथे मोकाट जनावरांना चारा पाण्याकरिता रक्कम आकरण्यात येत असल्याचे समोर आले आहे. जुलै महिन्यापासून पालिकेकडून राबविण्यात येत असून आतापर्यंत तब्बल २८ जनावरे पकडली आहेत. यात तीन मालकांकडून ही जनावरे आपली असल्याचे सांगितले आहे. या तिघांकडून १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वर्धा नगर पालिकेचे कर्मचारी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शहरातील विविध भागात फिरून आढळून आलेले मोकाट जनावरे ताब्यात घेत आहेत. आतापर्यंत या पथकाने मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनात शहर परिसरातून २८ जनावरे ताब्यात घेतली आहेत. ही मोहीम पथक प्रमुख अशोक ठाकूर यांच्यासह पालिकेचे १५ कर्मचारी कार्यरत आहेत. जनावरांच्या वयावरून आकारला जातो दंड मोहिमेदरम्यान ताब्यात घेण्यात आलेले मोकाट जनावरे जनावर मालकाकडून दंड वसूल करून त्यांच्या स्वाधीन केले जातात. पकडण्यात आलेल्या छोट्या जनावरांसाठी २ हजार ५०० रुपये तर मोठ्या जनावरांसाठी ५ हजार रुपये दंड वसूल केला जात आहे. पथकातील कर्मचारी मोकाट जनावरांना पकडून ट्रॅक्टर ट्रॉलीत भरून ते करुणाश्रमात नेतात. वर्धा न.प.ने ताब्यात घेतलेली मोकाट जनावरे जनावर मालकांनी वेळीच दंड भरून घेऊन न गेल्यास सदर जनावरांचा न.प.प्रशासन लिलाव करणार आहे. या लिलावात वर्धा शहरातील नागरिकाला सहभागी होता येणार नाही. - अश्विनी वाघमळे, मुख्याधिकारी न.प. वर्धा. लिलावातून पालिकेला कमाई पकडण्यात आलेल्या मोकाट जनावरांचा शासकीय नियमानुसार लिलाव करण्यात येणार आहे. लिलावातून मिळणारी रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात येणार आहे. यातून पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारवाईच्या गांभिर्यासाठी दंडाची रक्कम वाढविली पूर्वी मोकाट जनावरे अल्प दंड आकारून मालकांच्या स्वाधीन करण्यात येत होते. यामुळे जनावर मालकांकडून ही कारवाई गंभीर घेतल्या जात नसल्याचे दिसून आले. यावर मार्ग काढण्याकरिता पालिकेने आता दंडाची रक्कम वाढविल्याचे दिसून आले आहे. या दंड वाढीमुळे जनावरे रस्त्यावर येणार नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
एका जनावरामागे पालिकेला दीडशे रुपयांचा भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:39 AM