सोमवार ठरला अपघातवार : वर्धा शहरात दोन अपघात तर पुलगाव व समुद्रपूर येथे प्रत्येकी एक घटना वर्धा : जिल्ह्याकरिता सोमवार अपघातवार ठरला. एकाच दिवशी चार अपघात घडले असून यात एक युवक ठार तर आठ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात दोन अपघात वर्धा शहरात तर एक समुद्रपूर व अन्य एक पुलगाव शहरात घडला. चारही घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तपास सुरू आहे. समुद्रपूर येथे नागपूरकडून हिंगणघाटकडे येत असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला. तर युवती गंभीर जखमी झाली. शुभम मारोतराव खंदाळे (२२) रा. हिंगणघाट असे मृतकाचे नाव आहे. सदर घटना आजदा शिवारात सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. शुभम खंदाळे व त्याची मावसबहिण अबोली उर्फ कोमल मुरलीधर इंगोले (२०) रा. बल्लारशहा हे दोघेही दुचाकी क्र. एम.एच.३२ एसी. ३७२० ने नागपूर येथे गेले होते. येथून परत येत असताना त्यांच्या दुचाकीला आजदा शिवारात अज्ञात वाहनाने धडक दिली. यात रस्त्याच्या कडेला पडून शुभम खंदाळे याचा जागीच मृत्यू झाला. तर अबोली इंगोले ही गंभीर जखमी झाली. जखमीला समुद्रपूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क ) दुचाकी धडकल्या; चौघे गंभीर वर्धा : येथील आर्वी नाका परिसरात दोन भरधाव दुचाकी एकमेकांवर आदळल्या. यात दुचाकीवरील चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. अमोल धोंगडी (२०) रा. आंजी, पियुुष चंदनखेडे, मौसीन खान, व मुज्मील सैफुल इस्लाम कुरेशी (१९) रा. हुनमाननगर, वर्धा अशी जखमींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याचे अरुण दुर्गे यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करून दोन्ही दुचाकीचालकांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत. मोटरसायकल अपघातात एक गंभीर ४वर्धा - पुलगाव-वर्धा मार्गावरील पेट्रोलपंप नजीक दुचाकीचा अपघात झाला. यात नंदु सुधाकर रामटेके रा. पुलगाव हा गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी मध्यरात्री वाजताच्या सुमारास घडली. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमीला पुलगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने जखमीला सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. माहिती मिळताच पुलगाव पोलीस ठाण्याचे हरिदास मोहिजे, संजय मुजबैले, माथनकर यांनी घटनास्थळ गाठून एम. एच. ३२ ए. डी. ९७६१ क्रमांकाची अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेत पंचनामा केला. दुचाकी अपघातात दोघे गंभीर वर्धा : येथील पावडे चौक परिसरात भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. दोन्ही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात हलविल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पालसाहेब जाधव यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी अपघातग्रस्त एम.एच. ३२ यू. ५९६१ क्रमांकाची दुचाकी ताब्यात घेतली. वृत्तलिहिस्तोवर जखमींची नावे कळू शकली नाही.
चार अपघातांत एक ठार; आठ जण गंभीर
By admin | Published: November 08, 2016 1:47 AM