वर्धा : सायबर भामट्यांनी विविध शक्कल लढवून नागरिकांची फसवणूक करणे सुरु केले आहे. पोलिसांकडून वारंवार जनजागृती केली जात असतानाही उच्च शिक्षित महिला पुरुष भामट्यांच्या जाळ्यात अडकत असल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार रामनगर हद्दीत घडला असून लिंकवर क्लिक करताच महिला डॉक्टराच्या खात्यातून तब्बल १ लाख रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली. याप्रकरणी डॉक्टर महिलेने रामनगर पोलिसात ३ रोजी तक्रार दाखल केली.
प्राप्त माहितीनुसार, मगनवाडी परिसरातील रहिवासी महिला डॉक्टर घरी असताना तिच्या मोबाईलवर पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी बॅंकेतून मेसेज आला आणि लिंकवर क्लिक करण्यास सांगितले. महिलेने लिंकवर क्लिक केले असता महिलेच्या सेव्हिंग खात्यातून तब्बल १ लाख रुपयांची रक्कम परस्पर काढून घेत फसवणूक केली. डॉक्टर महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने थेट रामनगर पोलिस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.